राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; कंत्राटी 'कोरोना वॉरियर्स'ला मिळणार प्रोत्साहन भत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 01:56 PM2020-07-09T13:56:55+5:302020-07-09T13:57:38+5:30
कोरोना संबंधी कामकाज करणाऱ्यांना दि. १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट या कालावधीतील त्यांच्या उपस्थितीनुसार भत्ता दिला जाणार
पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार कोरोनाशी संबंधी कामकाज करणाऱ्यांना दि. १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट या कालावधीतील त्यांच्या उपस्थितीनुसार हा भत्ता दिला जाणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबत हा भत्ता देण्यात येणार आहे.
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणारे हजारो डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदी कर्मचारी आहेत. कोरोनाचे संकट आल्यानंतर सर्वत्र हे कर्मचारी कोविड रुग्णालयांसह कोविड केअर सेंटर, सर्वेक्षण आदी कामांमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र, पुण्यासह अनेक ठिकाणी या कर्मचाऱ्यांना किमान वेतनही मिळत नाही. याबाबत प्रशासनाकडे सातत्याने मागणीही करण्यात आली आहे. पुण्यामध्ये अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. प्रोत्साहन भत्ता मिळणार असल्याने या कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक व आरोग्य सेवा आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया व प्रसुती कक्षात प्रत्यक्ष कार्यरत कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ७५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास चालु वेतनाच्या १०० टक्के तर ५० ते ७५ टक्के व २५ ते ५० टक्केपर्यंत अनुक्रमे ७५ ते ५० टक्के भत्ता मिळेल. संशयित रुग्ण किंवा निदान झालेल्या रुग्णांच्या संपर्कात असलेल्या कर्मचाऱ्यांना वरील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत २५ टक्के कमी भत्ता तर सर्वेक्षण किंवा कार्यालयाीन कामातील कर्मचाऱ्यांना त्यापेक्षा २५ टक्यांनी कमी भत्ता दिला जाईल. मात्र २५ टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असलेल्या कर्मचाऱ्यांना भत्ता दिला जाणार नाही.
----------------