राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या राजीनाम्याबाबत राजभवनातून आली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 04:47 PM2022-11-28T16:47:04+5:302022-11-28T16:47:45+5:30

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून हटवावं अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून लावून धरली जात आहे

Important information came from the Raj Bhavan regarding the resignation of Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या राजीनाम्याबाबत राजभवनातून आली महत्त्वाची माहिती

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या राजीनाम्याबाबत राजभवनातून आली महत्त्वाची माहिती

googlenewsNext

मुंबई - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून राज्यात वाद निर्माण झाला आहे. कोश्यारी यांच्या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध केला जातोय. विरोधकांनी कोश्यारींच्या विधानावरून भाजपाला कोंडीत पकडले आहे. त्यातच सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पदमुक्त होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. माध्यमांमध्ये बातम्या झळकल्या. मात्र यावर आता राजभवनातून खुलासा करण्यात आला आहे. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याचं वृत्त पूर्णत: निराधार आणि चुकीचे आहे. या बातमीचं खंडन राजभवनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पदमुक्त होण्याच्या चर्चेला विराम मिळाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून हटवावं अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून लावून धरली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या विधानाचा निषेध करत महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 

३ डिसेंबरला रायगड किल्ल्यावर जनआक्रोश 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्याचे संपूर्ण पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. आता भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा २८ नोव्हेंबरपर्यंतची दिलेली मुदत संपल्यानं आंदोलन पुकारलं आहे. राज्यपालांच्या निषेधार्थ ३ डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर जनआक्रोश करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 

उदयनराजे भोसले म्हणाले, हा दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तरी परवडलं असतं. असे बोलत असताना उदयनराजेंना अश्रू अनावर झाले. येत्या ३ डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर आक्रोश व्यक्त करणार आहोत. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर त्यांचे नाव घेण्याचा कुणाला अधिकार नाही. असं उदयनराजेंनी खडसावले. 
 

Web Title: Important information came from the Raj Bhavan regarding the resignation of Governor Bhagat Singh Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.