रात्रीच्या वेळी बंद राहणार मुंबई मेट्रो-3 चे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 12:52 PM2017-08-11T12:52:22+5:302017-08-12T16:23:06+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो-3 च्या कामासंबंधी महत्वपूर्ण आदेश दिला आहे.
मुंबई, दि. 11 - मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो-3 च्या कामासंबंधी महत्वपूर्ण आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाने मेट्रो 3 चे काम रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रात्रीच्यावेळी चालणा-या कामामुळे आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार अनेक नागरीकांनी केली होती. यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
मुंबईमध्ये "मेट्रो 3" च्या अंतर्गत कुलाबा-बांद्रा-सिप्झ असा साडे तेहत्तीस किलोमीटरचा भूमिगत मेट्रो मार्ग बांधण्याचे काम सुरू आहे. यामार्गावर 27 स्थानके असणार आहेत. त्यापैकी 26 स्थानके भूमिगत असतील. तसेच, कुलाबा ते सिप्झ हे अंतर या भुयारी मेट्रोने केवळ 50 मिनिटांत पार करता येईल.
मेट्रोच्या बांधकामासाठी प्रीकास्ट टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे बांधकाम करणे सोपे होत आहे.
मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी रात्रीच्या सुमारास "मेट्रो 3" च्या कामाची पाहणी केली होती. त्यांनी मुंबईतील मेट्रो प्रकल्प सुरु असलेल्या पाच ठिकाणांचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत एमएमआरडीएचे अधिकारीही उपस्थित होते. देशातील इतर मेट्रोच्या कामांपेक्षा मुंबईतील मेट्रोचे बांधकाम मोठ्या जलदगतीने सुरु असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
दक्षिण मुंबईतील चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी, विधानभवन या परिसरात मिळून मेट्रो 3 ची 9 स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी एमएमआरसीएल सुमारे पाच हजार झाडांची कत्तल करणार आहे. याविरुद्ध चर्चगेट व कफ परेडच्या रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.
मेट्रो रेल्वे रुळावर धावली
मेट्रो रेल्वे रुळावर धावण्याची नागपूरकरांची प्रतीक्षा शुक्रवारी संपली. अखेर मेट्रो रेल्वे रुळावर धावली. मिहान मेट्रो डेपोमध्ये हैदराबाद मेट्रोकडून तीन वर्षांच्या लीजवर आलेले तीन कोचेस जोडून तयार केलेल्या रेल्वेला बॅटरीवर चालणाºया बुलंद शंटिंग वाहनाच्या मदतीने चालविण्यात आले. रेल्वेला महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
डिसेंबरअखेरपर्यंत मेट्रो प्रवासासाठी सज्ज
याप्रसंगी पत्रपरिषदेत दीक्षित यांनी सांगितले की, विमानतळ ते खापरी स्टेशनपर्यंत ५.६ कि़मी.पर्यंत जमिनीवरून धावणाºया कोचेसची महामेट्रोच्या स्तरावर टेस्टिंग व ट्रायल रन घेण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गेनायझेनच्या (आरडीएसओ) चमूच्या निगराणीत विधिवत ट्रायलची सुरुवात होईल.