भिवंडीत बोगस टेलिफोन एक्सचेंजवर छापे; दाऊद टोळीकडून वापर, 10 आरोपी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 05:01 AM2017-10-11T05:01:50+5:302017-10-11T05:02:40+5:30
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर तसेच छोटा शकील व अनिस इब्राहिम यांनी खंडणी वसुलीकरिता केलेले आंतरराष्ट्रीय कॉल्स स्थानिक असल्याचे
ठाणे : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर तसेच छोटा शकील व अनिस इब्राहिम यांनी खंडणी वसुलीकरिता केलेले आंतरराष्ट्रीय कॉल्स स्थानिक असल्याचे भासवणा-या भिवंडीतील बोगस टेलिफोन एक्सचेंजवर गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी रात्री छापे टाकले. कारवाईत १0 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
एक्सचेंज चालवण्याकरिता लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या इक्बाल कासकर आणि त्याच्या हस्तकांनी लोकांना धमकावण्यासाठी व्हीओआयपी (व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) कॉल्सचा वापर केल्याची माहिती तपासात उघड झाली होती. छोटा शकील आणि अनिस इब्राहिम यांनी विदेशातून लोकांना धमकावले. मात्र त्यांनीही व्हीओआयपी कॉल्सचा वापर केल्याने फोन नेमका कुठून आला, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते.
आॅगस्टमध्ये अंबरनाथ येथील एका व्यापाºयास खंडणीसाठी धमकावण्यात आले होते. पोलिसांनी या कॉलची पडताळणी केली असता, तो ओडिशा येथून आल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांचे पथक ओडिशा येथे गेले असता, तो कॉल तेथून केलाच नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी चौकशी केली असता, आंतरराष्ट्रीय कॉल बोगस टेलिफोन एक्सचेंजद्वारे रूट करून त्या व्यापाºयाला जोडला गेला. अशा पद्धतीने कॉल जोडल्याने समोरच्या व्यक्तीला तो कॉल नेमका कुठून आला आहे, हे समजत नाही. बोगस टेलिफोन एक्सचेंजचे जाळे भिवंडीत असल्याची माहिती उघड झाल्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी रात्री भिवंडीतील साईनगर नागावमध्ये छापे टाकले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एकाच वेळी जवळपास ३0 ठिकाणी छापे टाकले. त्यासाठी गुन्हे शाखेने वेगवेगळी पथके तयार केली होती.
घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात सिम बॉक्सेस, राऊटर्स, नोटपॅड, मोबाइल फोन आदी साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी जवळपास १0 आरोपींना ताब्यात घेतले आहे.
रात्री उशिरापर्यंत छापे सुरूच असल्याने पोलिसांनी या प्रकरणी फारशी माहिती दिली नाही. मात्र हे प्रकरण गंभीर असून, त्याची व्याप्ती मोठी असल्याचा दावा अधिका-यांनी केला.