मराठवाड्यात १७ ठिकाणी प्राप्तीकर विभागाचे छापे

By admin | Published: March 5, 2017 05:12 AM2017-03-05T05:12:33+5:302017-03-05T05:12:33+5:30

नोटाबंदीच्या काळात बँकेत अधिक पैसे जमा करणाऱ्यांविरुद्ध प्राप्तीकर विभागाने बडगा उगारला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डने (सीबीडीटी) मराठवाड्यात अशा ४०० लोकांची

Impressions of income tax department in 17 places in Marathwada | मराठवाड्यात १७ ठिकाणी प्राप्तीकर विभागाचे छापे

मराठवाड्यात १७ ठिकाणी प्राप्तीकर विभागाचे छापे

Next

औरंगाबाद : नोटाबंदीच्या काळात बँकेत अधिक पैसे जमा करणाऱ्यांविरुद्ध प्राप्तीकर विभागाने बडगा उगारला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डने (सीबीडीटी) मराठवाड्यात अशा ४०० लोकांची यादी तयार असून त्याआधारे प्राप्तीकर विभागाने चार दिवसांपासून औरंगाबादसह वैजापूर, जालना, बीड व लातूर येथील १७ ठिकाणी छापे टाकून सुमारे १० कोटी रुपयांपेक्षा अधिक बेहिशोबी रक्कम उघड केली आहे.
नोटाबंदीच्या काळात बचत खात्यांमध्ये अडीच लाख किंवा त्यापेक्षा अधिक व्यवहार झालेले खातेधारक तसेच चालू खात्यांमध्ये १२ लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केलेल्यांची माहिती बँकांद्वारे प्राप्तीकर विभागाला प्राप्त झाली आहे. त्यावरून प्राप्तीकर विभागाने बजावलेल्या नोटिशीला उत्तर न देणाऱ्यांविरुद्ध कारवाईस सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)

चार जिल्ह्यांत झाली कारवाई
मराठवाड्यात कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये औरंगाबादेतील ८ जण असून, ज्यात ३ कोचिंग क्लासेसचा समावेश आहे. वैजापूर येथील २ व्यावसायिक, जालना २, बीड २ व लातूर येथील ३ ठिकाणी छापे टाकण्यात आले.
सूत्रांनी सांगितले की, औरंगाबादेतील ज्या तीन बड्या कोचिंग क्लासेसवर छापे टाकण्यात आले आहेत, त्यांच्याकडील सुमारे ५ कोटी रुपयांची बेनामी रक्कम उजेडात आली आहे. याशिवाय काही व्यावसायिकांकडे अडीच ते तीन कोटींची बेहिशोबी रक्कम आढळून आली आहे.

बीडमध्ये १.३० कोटींची बेहिशेबी रक्कम
बीड जिल्ह्यातील एका कारखान्यात कर्मचाऱ्यांना पगारापोटी नोटाबंदीच्या काळात बाद झालेल्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा कारखाना प्राप्तीकर विभागाच्या रडारवर आला होता. जेव्हा या कारखान्यावर छापा टाकण्यात आला तेव्हा सुमारे १.३० कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम असल्याचे कारखान्याच्या व्यवस्थापनाने मान्य केले.

Web Title: Impressions of income tax department in 17 places in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.