धनादेश फसवणूकप्रकरणी कारावासाची शिक्षा
By admin | Published: June 22, 2016 09:11 PM2016-06-22T21:11:31+5:302016-06-22T22:00:10+5:30
मॅनेजरला दोन लाखांचा धनादेश देऊन फसवणूक करणाऱ्या रिअल इस्टेट एजंटला न्यायालयाने अडीच लाख रुपये दंड व सहा महिने कारासावाची शिक्षा सुनावली
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 22 - ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कंपनीतील सेवानिवृत्त मॅनेजरला दोन लाखांचा धनादेश देऊन फसवणूक करणाऱ्या रिअल इस्टेट एजंटला न्यायालयाने अडीच लाख रुपये दंड व सहा महिने कारासावाची शिक्षा सुनावली आहे़ या खटल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल दहा वर्षांनी निकाल लागला आहे़
या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, कौटुंबिक अडचणीमुळे रिअल इस्टेट एजंट योगेश जीवन मोहिते (कल्पतरुनगर,नाशिक-पुणे रोड) याने एचएएलचे मॅनेजर कमलाकर बाबूराव पांगारकर यांच्याकडून २००५ साली दोन लाख रुपये घेतले होते़ या रकमेची परतफेड म्हणून त्याने दोन लाख रुपयांचा धनादेश दिला होता, मात्र तो न वटल्याने पांगारकर यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता़
न्यायाधीश के. एस़ पिंगळे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली असून रिअल इस्टेट एजंट योगेश मोहिते यास अडीच लाख रुपये दंड व सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे़ फिर्यादीतर्फे अॅड़धर्मेंद्र चव्हाण यांनी काम पाहिले़