छुप्या पद्धतीने दारूविक्री तेजीत
By admin | Published: April 5, 2017 01:10 AM2017-04-05T01:10:56+5:302017-04-05T01:10:56+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगत असलेल्या दारू विक्रीचे हॉटेल, दुकाने बंद झाल्याने अवैध दारूविक्री तेजीत सुरू आहे
बारामती : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगत असलेल्या दारू विक्रीचे हॉटेल, दुकाने बंद झाल्याने अवैध दारूविक्री तेजीत सुरू आहे. बारामती शहरात फक्त दोन हॉटेल या मार्गांपासून दूर आहेत. तेथे मद्यपींची अगदी सकाळपासूनच गर्दी होत आहे. तर देशी दारूचीही चढ्या दराने विक्री होत आहे. दारूबंदीचा असाही फायदा आता अवैध दारूविक्री करणाऱ्यांकडून घेतला जात आहे.
बारामती शहरातील जवळपास ८० ते ८५ हॉटेल्स, दारू दुकाने बंद झाली आहेत. आता शहरातून जाणारे राज्य व राष्ट्रीय महामार्गाचे रूपांतर जिल्हा मार्गांमध्ये करून नगरपालिका, महानगरपालिका हद्दीतील दुकानांना अभय मिळेल, अशी आशा व्यावसायिकांना आहे.
सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यापासून ५०० मीटरची मर्यादा मद्यविक्रीच्या दुकानांना, हॉटेल्सला घातली आहे. १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यातून मार्ग काढत देशी दारूविक्रीचे परवाने असलेल्या मंडळींनी छुप्या पद्धतीने चढ्या दराने दारू विक्री करण्यास सुरुवात केली आहे. तर अवैध गावठी दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. फक्त दोन हॉटेल्स ५०० मीटरच्या लांबीवर आहेत. जादा दराने दारू विक्री खुले आम होत आहे.
शहरातील ८५ हॉटेल्समधील कामगारांना त्याचा फटका बसला आहे.
बारामती रेस्टॉरंट अँड हॉटेलिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल झगडे यांनी सांगितले, की आता मद्यविक्री बंद झाल्यामुळे हॉटेल्समध्ये फक्त जेवणाची सोय आहे. त्यामुळे कामगार कपात करावी लागली आहे. त्याचबरोबर व्यवसायावरदेखील परिणाम झाला आहे.
दरम्यान, झोपडपट्टीबहूल भागात हातभट्टी दारूची विक्री वाढली आहे. त्यावर मात्र, उत्पादन शुल्क विभागाने गांभीर्याने लक्ष दिलेले नसल्याचे चित्र आहे.
कायदेशीर परवाने घेऊन मद्यविक्री करणाऱ्यांवर बंधने घातली जात असताना छुप्या पद्धतीने होत असलेल्या दारूविक्रीवर, हातभट्टी विक्रीवरदेखील कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगण्यात येते.(प्रतिनिधी)
बेकायदेशीर मद्यविक्री खुलेआम
कोरेगाव मूळ : सरकारने नुकत्याच महामार्गापासून पाचशे मीटर आतील अंतरावर असलेल्या वाइन शॉप, परमिटरूम आणि बिअर शॉपीवर स्थगिती आणल्यामुळे पूर्व हवेली तालुक्यात सामान्य जनतेने या निर्णयाचे स्वागत केले आहे. खऱ्या अर्थाने महिलावर्गाने न्यायालयाचे अभिनंदन केले आहे.
५०० मीटरच्या पुढे बांधकाम?
न्यायालयाच्या निर्णयाच्या झटक्याने दारुविक्रीची कमाई ठप्प झाली आहे. दारूबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात पळवाटा काढण्यात तरबेज असलेल्या व्यावसायिकांनी महामार्गापासून आपली हॉटेल व दुकाने ५०० मीटरच्या पुढे नेऊन बांधकाम करण्याचा तत्काळ निर्णय घेतला आहे.
... तरच दारूबंदी यशस्वी
देशी-विदेशी दारूअड्डे जागोजागी उपलब्ध आहेत. यासाठी स्थानिक पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वरदहस्तानेच हे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर तरी त्याची कठोर अमलबजावणी व्हावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोरपासून उरुळी कांचन दरम्यान वाईन शॉप आणि परमिट रूम हॉटेल्स आहेत.
हवेली तालुक्यातील या भागात फुटाफुटावर असणाऱ्या बेकायदा हॉटेल व धंद्यांवर खुलेआम मद्यविक्री केली जाते. यामुळे अनेकांना दारू पिऊन आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे यानंतरच्या काळात तरी अपघातांचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. दारुबंदीची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या झाली तरच हे साध्य होऊ शकणार आहे. सध्यातरी खुलेआम विक्रीमुळे ते होताना दिसत नाही.
दारूची दुकाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून किमान ५०० मीटर अंतरावर असली पाहिजेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच दारूची बॅनर्स आणि जाहिरातीही काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य सचिव आणि राज्य पोलीसप्रमुखांवर असेल, असेही न्यायालयाने सांगितले आहे.मद्यविक्री बंदच्या या निर्णयाचे जनतेने मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे. खऱ्या अर्थाने महिलावर्गात विशेष स्वागत व न्यायालयाचे अभिनंदन झाले, परंतु न्यायालयाने महिलांची मुख्य अडचण म्हणजे विनापरवानाधारक म्हणजे अवैध धंदे समूळ नष्ट होणे, ही काळाची गरज असल्याचे न्यायालयाने समजून घ्यावे, अशी मुख्य मागणी महिलावगार्तून होऊ लागली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उरुळी कांचन हे गाव असून या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या गावात बेकायदेशीर दारूधंद्याना मोठ्या प्रमाणात ऊत आला असून, हॉटेलमध्ये मुबलक प्रमाणात दारू मिळते. सरकारने महामार्गालगत असलेली मद्याची दुकाने बंद केली, पण बेकायदेशीर दारू कधी बंद होईल, हा प्रश्न मात्र सर्वसामान्य जनतेसमोर आहे.