सुधार समिती : बाळासाहेब ठाकरे यांच्या महापौर बंगल्यातील स्मारकाला मंजुरी
By admin | Published: January 12, 2017 04:43 AM2017-01-12T04:43:24+5:302017-01-12T04:43:24+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्याचे शिवसेनेचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्याचे शिवसेनेचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदिल दाखवल्यानंतर, महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आज तातडीने सुधार समितीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, दादर पश्चिम शिवाजी पार्क येथील पुरातन वास्तू असलेल्या महापौर बंगल्यात हे स्मारक तयार होणार आहे. एकीकडे युतीसाठी चर्चा सुरू झालेली असताना, मित्र पक्ष भाजपाकडून शिवसेनेला
मिळालेली ही भेट वेगळे संकेत देत आहे.
शिवसेना प्रमुखांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी गेली पाच वर्षे जागेचा शोध सुरू आहे. अखेर शिवसेनेचा पूर्वीचा बालेकिल्ला असलेल्या महापौर बंगल्याची निवड करण्यात आली. युतीमध्ये फूट पडली, तरी भाजपाने साथ दिल्याने स्मारकासाठी जागेचा प्रश्न सुटला आहे. महापौर बंगला ३० वर्षांच्या भाडेकरारावर या स्मारकासाठी स्थापन झालेल्या संस्थेला मिळणार आहे. यासाठी दरवर्षी नाममात्र एक रुपया शुल्क आकारण्यात येणार आहे.
ही मंजुरी राज्य सरकारकडून मिळाली, तरी कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे महापालिकेच्या सुधार समितीची मंजुरी आवश्यक होती. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल आज वाजणार हे निश्चित असल्याने, महापालिका मुख्यालयात सकाळी तातडीने बैठक बोलावून ही जागा स्मारकासाठी स्थापन न्यासाला हस्तांतरित करण्याची मंजुरी शिवसेना-भाजपाने घाईघाईने दिली. (प्रतिनिधी)
तातडीने बैठक
निवडणुकीचे बिगुल आज वाजणार हे निश्चित असल्याने, सकाळी तातडीने बैठक बोलावून ही जागा स्मारकासाठी स्थापन न्यासाला हस्तांतरित करण्याची मंजुरी देण्यात आली.