सुधारणांची रेल अद्याप ‘नॅरोगेज’वर...

By Admin | Published: February 23, 2015 11:25 PM2015-02-23T23:25:04+5:302015-02-23T23:56:27+5:30

प्रवाशांच्या अपेक्षा : पुणे-सांगली-कोल्हापूर मार्गाच्या दुहेरीकरण, विद्युतीकरणाची मागणी प्रलंबित

Improvement Rail still on 'Naroges' ... | सुधारणांची रेल अद्याप ‘नॅरोगेज’वर...

सुधारणांची रेल अद्याप ‘नॅरोगेज’वर...

googlenewsNext

सदानंद औंधे -मिरज - सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांना गुरुवारी सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात नवीन रेल्वेगाड्या व प्रवासी सुविधांची अपेक्षा आहे. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर मराठी रेल्वेमंत्री अर्थसंकल्प सादर करणार असल्याने प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुणे-सांगली-कोल्हापूर या मार्गाचे विद्युतीकरण, दुहेरीकरण व जत-विजापूर यासह कऱ्हाड-कडेगाव-खरसुंडी-आटपाडी-पंढरपूर या नवीन रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतूद आवश्यक आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी गेल्या तीन वर्षांत एकही नवीन एस्क्प्रेस सुरू झालेली नाही. सुधारणांची रेल अजूनही ‘नॅरोगेज’च्या गतीनेच धावत आहे.


गतवर्षी रेल्वे अर्थसंकल्पात पुणे-सांगली-कोल्हापूर या २२७ किमी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सर्वेक्षणाची घोषणा झाली आहे. दहा वर्षांपूर्वी करण्यात आलेले सर्वेक्षण बासनात गुंडाळून वारंवार दुहेरीकरणासाठी केवळ सर्वेक्षण करण्यात येत आहे. कोल्हापूर-मिरज-पुणे या रेल्वे मार्गावर प्रवासी व मालवाहतूक मोठी आहे. या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण झाल्यास रेल्वे प्रवास जलद होणार आहे. यापूर्वी रेल्वे अंदाजपत्रकात लोंढा-मिरज-पुणे या मार्गाच्या विद्युतीकरणासाठी सर्वेक्षणाची घोषणा झाली; मात्र यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद झालेली नाही. कोल्हापूर ते वैभववाडी या कोकण रेल्वेला जोडणाऱ्या नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. मात्र नवीन रेल्वेमार्गाचे काम रेल्वेमंत्री सुरू करतील, अशी अपेक्षा आहे. पुणे-कोल्हापूर इंटर सिटी एक्स्प्रेस, कोल्हापूर-मिरज पॅसेंजर कऱ्हाडपर्यंत सोडण्याची व लोंढा पॅसेंजर वास्कोपर्यंत सोडण्याची प्रवाशांची मागणी प्रलंबित आहे. शेडबाळ-अथणी-विजापूर, कऱ्हाड-चिपळूण या नवीन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या नवीन रेल्वेमार्गाचे काम कधी सुुरू होणार, याबाबत अनिश्चितता आहे. फलटण-बारामती या नवीन रखडलेल्या रेल्वेमार्गासाठी रेल्वे अंदाजपत्रकात कोल्हापूर व मिरज मॉडेल रेल्वेस्थानक बनविण्याची मिरजेत रेल्वे हॉस्पिटल व मॉल उभारण्याची केवळ घोषणा ठरली आहे. रेल्वे अर्थसंकल्पात त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी आहे.


पश्चिम महाराष्ट्रास  काय  हवंय?
मिरज-कोल्हापूर, मिरज-पुणे, मिरज-बेळगाव या पॅसेंजर रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी असल्याने पॅसेंजरचे डबे वाढविण्याची मागणी आहे. यावर्षी रेल्वे अंदाजपत्रकात रेल्वेमंत्री पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना काय देणार, याबाबत उत्सुकता आहे. मिरज जंक्शन स्थानक असतानाही कृषी मालाच्या वाहतुकीसाठी सुविधा अपुऱ्या आहेत. फुले, डाळिंब, द्राक्षांची दिल्लीला निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवासी रेल्वगाड्यात जागा मिळत नाही. हुबळी व बेंगलोरमधून बोगी भरून येत असल्याने येथील शेतकऱ्यांची अडचण होते. मिरजेतून कृषी मालाच्या निर्यातीसाठी व्यवस्था करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.


जिल्ह्यात रेल्वेने सिमेंट, खते व इंधनाची आयात व साखर, धान्याची निर्यात होते. औद्योगिक उत्पादनांच्या मालवाहतुकीसाठी आवश्यक सुविधा व मालगाडी मिरजेतून उपलब्ध होत नसल्याने कर्नाटकात उगार येथून मालाची निर्यात करावी लागते. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेल्वे मालवाहतूक सुविधा उपलब्ध करण्याची मागणी आहे. प्रतिवर्षी रेल्वे अंदाजपत्रक पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी निराशाजनक ठरते. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांच्या मागण्यांकडे नेहमीच रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येते; मात्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांच्या मागण्यांना न्याय देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पाच वर्षांत कर्नाटकचा प्रभाव...
रेल्वे मंत्री खडगे, सदानंद गौडा, रेल्वे राज्यमंत्री मुनीआप्पा यांनी गेल्या पाच वर्षांत रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा न करता यशवंतपूर-दिल्ली संपर्कक्रांती एक्स्प्रेस,बेळगाव-मिरज पॅसेंजर, यशवंतपूर-चंदीगड एक्स्प्रेस, वास्को-चेन्नई एक्स्प्रेस, हुबळी-मिरज-कुर्ला एक्स्प्रेस, मिरज-यशवंतपूर एक्स्प्रेस या कर्नाटकातून अनेक नवीन रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी रेल्वे प्रशासनापुढे प्रभावहीन असल्याने सांगली, कोल्हापुरातून नवीन रेल्वेगाड्या सुरू होत नाहीत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून नवीन रेल्वेगाड्यांसह प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आहे.

नवीन रेल्वेमार्गाची उभारणी नाही
१९२७ नंतर मिरजेपासून एकाही नवीन रेल्वेमार्गाची उभारणी झालेली नाही. मिरज-पंढरपूर रेल्वेमार्गाचे रूंदीकरण तीन वर्र्षांपूर्वी पूर्ण झाले; मात्र मिरज-पंढरपूर मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहे. या मार्गावर नवीन कोल्हापूर-सोलापूर एक्स्पेस, कोल्हापूर-हैदराबाद एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी प्रलंबित आहे.

दुष्काळी भागासाठी तरतूद हवी
कवठेमहांकाळ-जत-विजापूर व कऱ्हाड-कडेगाव-लेंगरे-खरसुंडी-आटपाडी-दिघंची-महूद-पंढरपूर या सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातून जाणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाची गतवर्षी घोषणा झाली.

सर्वेक्षणाचे काम एक महिन्यापूर्वी सुरू झाले आहे. जिल्ह्यातील दुष्काळी भागाच्या विकासाला पूरक ठरणाऱ्या या नवीन रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतूद होणे आवश्यक आहे.

Web Title: Improvement Rail still on 'Naroges' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.