"त्यांच्या थोबाडीत मारायला हवी होती"; नितेश राणेंच्या विधानावर इम्तियाज जलील यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 06:00 PM2024-08-14T18:00:53+5:302024-08-14T18:04:29+5:30
आमदार नितेश राणे यांनी सांगलीत बोलताना महाराष्ट्र पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.
Imtiyaz Jaleel on Nitesh Rane : भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा सांगलीत बोलताना महाराष्ट्र पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. पोलिसांनो अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही, अशी उघड धमकी दिल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. विविध स्तरातून नितेश राणे यांच्याविषयी निषेध व्यक्त केला जात आहे. 'एमआयएम'चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही नितेश राणेंवर जोरदार टीका केली आहे. नितेश राणेंना महत्त्व देऊ नका असं म्हणत जलील यांनी या विधानाबाबत भाष्य केलं आहे.
नितेश राणे हे मंगळवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चात बोलत होते. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. मी काही निवेदन वगैरे देत बसत नाही, ती भाषा मला जमत पण नाही. मी डायरेक्ट कार्यक्रम करतो, असेही नितेश राणे म्हणाले होते. त्यावर आता एमआयएमचे इम्तियाज जलील नितेश राणेंवर टीका केलीय.
काय म्हणाले नितेश राणे?
पोलीस विभागीतील काही पोलीस अधिकारी हिंदू समाजाच्या लव्ह जिहादाचा विषय आल्यास लवकर केस दाखल करत नाहीत. मुलीच्या पालकांबरोबर गैरव्यवहार करतात. अशा पोलिसांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव खराब होतं. अशा सडक्या आंब्यांना त्या पद्धतीचा इशारा देतो. राज्यात हिंदुत्ववादी सरकार असून हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका. हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू दिसले तर अशा जिल्ह्यात बदली करु, बायकोचाही फोन लागणार नाही, असा इशारा नितेश राणेंनी दिला.
"आपण नितेश राणेंना खूप महत्त्व देतोय. महाराष्ट्रात भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे जाती जातींचे विभाजन पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने तिथे चांगला पोलीस अधिकारी असला असता तर त्याने त्यांच्या थोबाडीत मारायला पाहिजे होती. तुम्ही अशा प्रकारे द्वेष निर्माण करण्याचे काम करताय आणि मग महाराष्ट्र पोलिसांचे हात बांधलेले आहेत का?," असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला.
नितेश राणे वक्तव्यावर ठाम
"मी सर्वच पोलीस अधिकाऱ्यांबद्दल बोललो नाही. मात्र, काही पोलीस अधिकारी लव जिहाद व लँड जिहादवाल्यांना मदत करतात. पोलीस विभागातील काही अधिकारी हिंदू समाजातील लव्ह जिहादचे विषय आल्यास १० ते १५ दिवस केस दाखल करत नाही. काही पोलीस अधिकाऱ्यामुळे पोलीस विभाग बदनाम होतो आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नाव खराब होत आहे. पीडित मुलींच्या आईवडिलांचे ऐकून घेणार नसेल, न्याय मिळवून देण्यापेक्षा पीडितांची चौकशी करणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका घेणे माझे कर्तव्य आहे. विरोधकांच्या इशाऱ्यावर जे अधिकारी काम करणार असेल तर अशा अधिकाऱ्यांनी आपली वर्दी वाचवून दाखवावी," असे स्पष्टीकरण नितेश राणे यांनी दिलं.