१९५२ मध्ये जगाला महामानवाचे मोठेपण सांगणारा सोहळा कोल्हापुरात झाला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 07:37 AM2023-12-06T07:37:55+5:302023-12-06T07:38:16+5:30

बाबासाहेबांना महिलांनी दिले होते मानपत्र

In 1952, the ceremony that told the world about the greatness of the great man Dr Babasaheb Ambedkar was held in Kolhapur | १९५२ मध्ये जगाला महामानवाचे मोठेपण सांगणारा सोहळा कोल्हापुरात झाला होता

१९५२ मध्ये जगाला महामानवाचे मोठेपण सांगणारा सोहळा कोल्हापुरात झाला होता

विश्वास पाटील
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवंतपणीच बिंदू चौकात पुतळा बसविणाऱ्या कोल्हापूरने त्यानंतर दोनच वर्षांनी मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला होता. विशेष म्हणजे महिलांनी हा समारंभ आयोजित केला होता. महिलांना वारसाहक्कात स्थान देणारे हिंदू कोड बिल मंजूर करावे, यासाठी आग्रह धरणाऱ्या डॉ. बाबासाहेब यांना पाठबळ देण्याची भूमिका त्यामागे होती. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या आठवणी ताज्या झाल्या.

करवीर भगिनी मंडळ, शुक्रवार पेठ भगिनी मंडळ, महिला सेवा मंडळ, वनिता समाज, नामदेव महिला मंडळ, शारदादेवी महिला मंडळ, स्त्री मंडळ, शिवाजी पेठ भगिनी मंडळ आणि मराठा महिला मंडळ ही मानपत्र देणारी नऊ मंडळे आहेत. स्वातंत्र्यानंतर लगेचच या महिलांना बाबासाहेबांना मानपत्र द्यावे असे वाटावे यामध्येच कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय प्रगल्भतेचे प्रत्यंतर येते. हे मानपत्र २५ डिसेंबर १९५२ रोजी राजाराम टॉकीजमध्ये देण्यात आले. विशेष नोंद म्हणजे बाबासाहेब त्या सोहळ्यास पत्नी माईसाहेब आंबेडकर यांच्यासह आले होते. 

या भगिनी मानपत्रात म्हणतात...
माननीय बाबासाहेब, कोल्हापुरात १५ वर्षांपासून नऊ भगिनी मंडळे भगिनी वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहेत. मुंबई प्रांतात द्विभार्या प्रतिबंधक कायदा होण्यापूर्वी तो व्हावा, असा आवाज प्रथम कोल्हापूरच्या महिलांनीच उठवला होता. सन १९४१ व १९४७ मध्ये हंसा मेहता व लेडी रामराव यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरातील अखिल भारतीय महिला परिषदेत वारसा हक्काची मागणी झाली. हिंदू कोड बिलानेच महिलांच्या आकांक्षांची पूर्तता होणार हे जाणून सर्व भगिनींनी त्यास एकमुखी पाठिंबा दिला. त्यामुळे इच्छा नसतानाही राज्यकर्त्यांना सार्वत्रिक निवडणुकीत या बिलास पाठिंबा द्यावा लागला. आज जरी प्रासंगिक लाभासाठी हे बिल मागे खेचण्याचा काहीजण प्रयत्न करत असले तरी त्यांचा तो प्रयत्न म्हणजे सुपाने सूर्य झाकण्याचा हव्यास बाळगण्यासारखेच वेडेपणाचे आहे. (संदर्भ : डॉ. जी.पी. माळी यांचे कोल्हापूरची शतमानपत्रे हा ग्रंथ)

Web Title: In 1952, the ceremony that told the world about the greatness of the great man Dr Babasaheb Ambedkar was held in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.