जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 10:12 AM2024-09-24T10:12:00+5:302024-09-24T10:13:42+5:30

सोमवारी अमरावतीच्या धारणी तालुक्यातील ओव्हर स्पीडच्या नादात खासगी बस ट्रॅव्हल्स नाल्यात उलटल्याने भीषण अपघात घडला. 

In a private bus accident at Dharani in Amravati, Death of Dr. Pallavi Kadam | जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला

जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला

अमरावती - सेमाडोहनजीक नाल्यात खासगी बस कोसळून झालेल्या अपघातामध्ये ३२ वर्षीय डॉ. पल्लवी कदम यांचाही मृत्यू झाला. त्यांचा यंदा ११ जुलैला एमआयडीसी परिसरातील रहिवासी राहुल इंगोले यांच्याशी विवाह झाला. आठ दिवसांपूर्वीच या दाम्पत्याला पल्लवी गर्भवती असल्याची गोड वातदिखील समजली होती. त्यामुळे कदम आणि इंगोले है दोन्ही कुटुंबीय आनंदात रममाण झाले होते, परंतु या अपघाताने तो आनंद आणि पल्लवी यांनादेखील हिरावून नेले.

पल्लवी कदम या मेळघाटातील चिचघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मागील दोन वर्षांपासून समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. मूळच्या आष्टी (ता. वर्धा) येथील त्या रहिवासी. लग्नापूर्वी त्या चिचघाट येथे राहून आरोग्य सेवा देत होत्या. मात्र, विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यांनी अमरावती ते चिचघाट असा रोजचा प्रवास सुरू कैला. कर्तव्यावर पोहोचण्यासाठी त्या पहाटे ५ वाजताच्या खासगी बसने नेहमीच प्रवास करीत होत्या. 

आठ दिवसांपूर्वीच पल्लवी आणि राहुल या दाम्पत्याच्या जीवनवेलीची कळी खुलल्याची गोड वार्तादेखील त्यांना समजली होती. सोमवारी राहुलने त्यांना खासगी ट्रॅव्हल्सवर सोडले. त्यावेळी स्मितहास्य करत त्यांनी पतीला निरोप दिला. ती त्यांची अखेरची भेट ठरली. डॉ. पल्लवी यांचा मृतदेह सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान शवविच्छेदनानंतर घरी आणण्यात आला. त्यांच्यावर शहरातील हिंदू स्मशानभूमी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

३ महिन्यापूर्वीही उलटली होती बस

या मार्गावर सतत अपघात घडत असतो, विशेष म्हणजे याच चावला कंपनीची बस तीन महिन्यांपूर्वी घटांग गावाजवळ वळणावर उलटली होती. त्यावेळी जीवितहानी झाली नाही. 

५ वर्षाची चिमुकली अन् आईचीही प्रकृती गंभीर

गायत्री मावस्कर या ५ वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्याला अपघातात मार लागल्याने ती गंभीर आहे. तिला सुरुवातीला नागपूर रेफर करण्याचे सांगितले होते. या चिमुकलीसह तिची आई काली मावस्करही गंभीर जखमी आहेत. 

शिक्षकाला नागपूरला हलवले

ट्रॅव्हल्समधून एकूण सात शिक्षक मेळघाटात कर्तव्यावर निघाले होते. यातील नारायण पुरी नावाच्या शिक्षकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी नागपूरला नेण्यात आले आहे. एका शिक्षकावर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात, एका महिला शिक्षिकेवर अमरावतीत खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या शिक्षिकेच्या डोक्याला जबर मार लागला आहे.

Web Title: In a private bus accident at Dharani in Amravati, Death of Dr. Pallavi Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात