भिंगार शहर प्रमुखासह तीन माजी नगरसेवक शिंदे गटात; अहमदनगर शहरात मिळणार बळ
By सुदाम देशमुख | Published: July 29, 2022 12:14 PM2022-07-29T12:14:47+5:302022-07-29T12:16:53+5:30
नगर शहर शिवसेनेत उभी फूट पडलेली असतानाच भिंगारमध्येही शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.
अहमदनगर: नगर शहर शिवसेनेत उभी फूट पडलेली असतानाच भिंगारमध्येही शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. सेनेचे भिंगार शहर प्रमुख प्रकाश फुलारी यांच्यासह छावणी मंडळाचे माजी नगरसेवक सुनील लालबोंद्रे, संजय छजलानी आणि रवींद्र लालबोंद्रे यांच्यासह एक गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाला आहे.
यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे ,माजी नगरसेवक काकासाहेब शेळके, सचिन जाधव आदी उपस्थित होते.
शिवसेनेचे माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते व ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे भिंगार शहर प्रमुख प्रकाश फुलारी यांच्यासह तीन माजी नगरसेवकांनी काल गुरुवारी रात्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. भिंगार छावणी मंडळात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस ,असे मिळून सात नगरसेवक होते. त्यापैकी तीन माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाल्याने भिंगार शहरात शिवसेनाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.
आजी-माजी नगरसेवकांच्या प्रवेशामुळे नगर शहरातील शिंदे गटाला बळ मिळाले आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक आजी-माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, परिषद पंचायत समिती सदस्य, सरपंच व सदस्य आपल्या संपर्कात असल्याचा दावा नगर शहरातील शिंदे गटाकडून केला जात आहे.