साहेब, आमचे विठ्ठल पण त्यांना बडव्यांनी घेरलंय; छगन भुजबळांचा घणाघात, रोख जयंत पाटलांकडे?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 01:30 PM2023-07-05T13:30:04+5:302023-07-05T13:49:47+5:30
सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला हे खरे आहे. परंतु जसजशी भाषणे होतील त्यात बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल असं भुजबळांनी म्हटलं.
मुंबई – आम्ही तुरुंगात जाऊन आलो, त्यानंतर अनेकांनी आमिष दाखवली. पण तरीही शरद पवारांसोबत आम्ही एकनिष्ठ राहिलो. पण आता हे का झाले. साहेब आमचे विठ्ठल पण या विठ्ठठलाला बडव्यांनी घेरले आहे. त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या. साहेब आम्ही गेलो ते तुमच्या भोवती जे बडवे जमलेत त्यांच्यामुळे आम्ही बाहेर पडलो. तुम्ही आवाज द्या, त्या बडव्यांना बाजूला करा आम्ही पुन्हा यायला तयार आहोत. नागालँडला परवानगी दिली मग आम्हालाही परवानगी द्या. सत्कार करा. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू. सगळ्यांनी मजबुतीने उभे राहा. कार्यकर्त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी जयंत पाटील यांच्यावर घणाघात केला आहे.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, १० वर्ष एकही पैसा न घेता शिवाजीराव गर्जे काम करत होते. ते इथं का आले? तिथे चाललेला कारभार, ज्यांच्यामुळे हे सगळे घडले ते यासाठी जबाबदार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना नीट वागणूक दिली जात नव्हती. शरद पवारांना वाईट वाटणे स्वाभाविक. साहेब वसंतदादांना तुम्ही सोडले तेव्हा वसंतदादांनाही असेच वाईट वाटले. मी बाळासाहेबांना माता-पिता मानत होतो. मला तुमच्यासोबत येणे भाग पाडले. तेव्हा तुम्ही मला थांबवले नव्हते. तेव्हा बाळासाहेबांनाही वाईट वाटले. धनंजय मुंडे यांना तुम्ही घेतले तेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या डोळ्यातही अश्रू आले होते. हे सर्व माघारी फिरले असंही त्यांनी सांगितले.
कायदा आम्हालाही कळतो...
२ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी, सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला हे खरे आहे. परंतु जसजशी भाषणे होतील त्यात बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. ४० पेक्षा जास्त आमदार आमच्या पाठिशी आहे. या सर्व आमदारांची प्रतिज्ञापत्रावर सह्या झाल्या आहेत. आमच्यावर कारवाई होईल असं काही सांगतात. मी शरद पवारांसोबत ५७-५८ वर्ष काम करतोय. नियमांच्या बाहेर जाऊन आम्ही काम कसं करू. कायदे आम्हालाही कळतो. त्यामुळे ही कारवाई होईल असं बोलतायेत. परंतु या सर्व गोष्टींचा विचार करून पुढे पाऊल टाकले आहे. सर्व बाबींचा, कायद्याचा विचार करूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे पाऊल उचलले आहे असं छगन भुजबळांनी सांगितले.
नियुक्त्या रखडवल्या, प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक का नाही?
तुमच्यासोबत कार्यकर्ते आहेत का, जिल्हाध्यक्ष आहेत का असं म्हटलं जाते. आज इथं प्रचंड गर्दी झालीय. अत्यंत शॉर्ट नोटीस देऊन ८ हजारांहून अधिक पदाधिकारी इथं जमलेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वात नव्या दमाने, मजबुतीने पुढे वाटचाल करणार आहे. बऱ्याच नियुक्त्या व्हायच्या आहेत. काही दिवसांत त्याही होतील. मात्र तिथे वारंवार सांगून सुद्धा, शरद पवारांनी बोलूनही तिथले कारभारी नेमणुका करत नव्हते. सर्व निवडणुका घ्या, प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक घेत नव्हते. पक्ष काम कसा करणार? कार्यकर्ते नसतील तर पक्ष काम कसे करणार? मुंबईचा अध्यक्ष ६ महिने निवडला नाही. अनेक कामे रखडली होती. सांगूनही नियुक्त्या झाल्या नाहीत. हे काम होत नसेल तर मी पक्षाची जबाबदारी घेतो असं अजित पवार म्हणाले. दुसऱ्यादिवशी मीही सांगितले. पक्षात सर्व समाजाचे घटक आवश्यक असतात. परंतु हे करायला हवे होते. १५ दिवस वाट पाहिली आणि शेवटी निर्णय घ्यावा लागला असं छगन भुजबळांनी सांगितले.