क्रुरतेचा कळस..! घरासमाेर भुंकताे म्हणून श्वानाचे डाेळे फाेडले; चौघांविरोधात गुन्हा दाखल
By आशीष गावंडे | Published: August 9, 2024 07:39 PM2024-08-09T19:39:24+5:302024-08-09T19:43:40+5:30
मारहाण करणाऱ्या चार जणांविराेधात पाेलिसात गुन्हा दाखल, प्राणीमित्र संतापले.
अकाेला: शहरातील तापडिया नगरमध्ये क्रुरतेचा कळस गाठणारा प्रकार समाेर आला आहे. शेजारच्या घरातील पाळीव श्वान राेज भुंकतो. त्याचा त्रास हाेताे म्हणून त्याचे चक्क डोळे फोडत अतिशय क्रुरपणे मारहाण केल्याची घटना ८ ऑगस्ट राेजी घडली. याप्रकरणी श्वानाचे पालन पाेषण करणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरुन रामदासपेठ पाेलिस ठाण्यात चार जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साेनू देशमुख रा.माेहन भाजीभंडार जवळ,तापडिया नगर असे मारहाण करणाऱ्या मुख्य आराेपीचे नाव आहे. सुनिता श्रीराम साेनाेने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या व आराेपी देशमुख हे शेजारी आहेत. साेनाेने यांच्या घरी सुमारे ५ ते ६ वर्षे वयाचा श्वान आहे. हा श्वान भुंकत असल्यामुळे त्याच्या भुंकण्याचा त्रास हाेत असल्याचा राग मनात ठेऊन आराेपी देशमुख याने आणखी तीन अनाेळखी इसमांसह ८ ऑगस्ट राेजी सकाळी फिर्यादी महिलेच्या घरात प्रवेश केला. श्वानाला पकडून त्याचे पाय बांधले व त्याच्यावर हाॅकी स्टीक व काठ्यांनी अमानुषपणे प्रहार केले. या मारहाणीत श्वानाचे दाेन्ही डाेळे फाेडले तसेच जबडा, पाय व पाठीच्या मणक्याला जबर दुखापत केली. यात श्वानाला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी फिर्यादी सुनिता साेनाेने यांनी रामदासपेठ पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पाेलिसांनी साेनू देशमुख याच्यासह तीन अनाेळखी इसमांवर बीएनएस कलम ३२५, ३५१(२), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम ३(५),११ (१),(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
श्वानाला कचरा संकलन करणाऱ्या वाहनात फेकले
साेनू देशमुख व त्याच्या सहकाऱ्यांनी या श्वानाला गंभीररित्या जखमी केल्यानंतर त्याला अत्यंत निर्दयीपणे महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहनात (एमएच ३० एच- ५२७१)फेकून दिले. फिर्यादी महिलेने या वाहनाचा पाठलाग केला. वाहनाला थांबवून त्यातील जखमी श्वानाला बाहेर काढले. तसेच आधार फाॅर अनिमल संस्थेच्या संस्थापक काजल राऊत यांच्याशी संपर्क साधला. व तातडीने श्वानाला स्नातकाेत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था येथील वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती केले.
जखमी श्वानावर उपचार
जखमी श्वानावर स्नातकाेत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था येथील वैद्यकीय रुग्णालयात डाॅ.आर.व्ही.राहुळकर, डाॅ.अभिनव साेनटक्के व त्यांच्या चमूकडून उपचार करण्यात आले. परंतु मारहाणीत श्वानाचे दाेन्ही डोळे निकामी झाले असून जबडा, कंबर फ्रॅक्चर झाली आहे. तसेच त्याच्या अंगावर अनेक गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत. ९ ऑगस्ट राेजी श्वानाला आधार फाॅर एनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये उपचारासाठी भरती केले आहे.
मुक्या,निष्पाप श्वानाला इतक्या क्रुरपणे मारहाण केल्याचे पाहून धक्काच बसला. याप्रकरणी दाेषी व्यक्तींवर कठाेर कारवाइ व्हावी,यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांना निवेदन दिले आहे. यापुढे या श्वानाचे आम्ही पालन,पाेषण करु. - काजल राऊत संस्थापक आधार फाॅर अॅनिमल्स संस्था