आनंद दिघे यांच्या चित्रपटामध्ये ही शिवी देण्यात आलेली; जामीन मिळाल्यानंतर दत्ता दळवींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 04:06 PM2023-12-01T16:06:02+5:302023-12-01T16:06:24+5:30
शिवसैनिक माझ्या बरोबर नाही तर शिवसेनेबरोबर उभे राहिले. ही बाळासाहेबांची किमया आहे. मला मुद्दामहून अटक करण्यात आली, असा आरोप दळवी यांनी केला.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी महापौर दत्ता दळवी यांची जामीनावर सुटका झाली आहे. भाषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दळवी यांना तीन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. जामीन मिळाल्यानंतर दळवींनी ती शिवी आनंद दिघेंवरील धर्मवीर चित्रपटात देखील दिल्याचा दावा केला आहे. तसेच जाणून बुजून अटक केल्याचा आरोप केला आहे.
या काळात शिवसैनिक माझ्या बरोबर नाही तर शिवसेनेबरोबर उभे राहिले. ही बाळासाहेबांची किमया आहे. मला मुद्दामहून अटक करण्यात आली. हा सत्तेचा माज आहे, सत्तेत असणाऱ्यांनी कसे वागावे ठरवावे लागेल. कायमस्वरुपी सत्ता तुमच्याकडे नाही राहणार. माझे वय ७१ असले तरी आमच्यात शिवसेनेचे रक्त आहे. माझी गाडी फोडली तेव्हा मी असतो तर दोघांना तरी लोळवले असते. मी जेलमध्ये असताना ते कोणाला भेटले कुठे बसले होते मला माहीत आहे, असा इशारा दळवी यांनी दिला.
समोर या ना, ही भ्याड वृत्ती आहे. गाडी तोडण्यापेक्षा विचारांनी लढा. आमच्या कुटुंबाला ही वेळ नवी नाही. शिवसेना प्रमुखांनी घडवले शिवसैनिक सदैव सोबत असतात, जेलमध्येही व्यवस्था केली होती. पक्षप्रमुखांनी दोनदा फोन केला, आम्ही आहोत सगळे, घाबरु नको, असे सांगितले. मी मातोश्रीवर जाणार असल्याचे दळवी म्हणाले.