दहावी-बारावी परीक्षेत आता आयत्या वेळी मिळेल प्रश्नपत्रिका, शिक्षण मंडळाचा निर्णय; पेपरफुटीवर उतारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 06:52 AM2023-02-11T06:52:58+5:302023-02-11T06:56:05+5:30
परीक्षा कालावधीत प्रश्नपत्रिका माेबाइलवर तसेच समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याचे काही प्रकार यापूर्वी निदर्शनास आले हाेते.
मुंबई/पुणे : दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर सुरू हाेण्याच्या निर्धारित वेळेच्या दहा मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जात हाेती. यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात हाेणाऱ्या परीक्षेत ही पद्धत बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
परीक्षा कालावधीत प्रश्नपत्रिका माेबाइलवर तसेच समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याचे काही प्रकार यापूर्वी निदर्शनास आले हाेते. परीक्षा दालनात परीक्षा सुरू हाेण्यापूर्वी प्रश्नपत्रिकांचे वितरण केल्यामुळे केंद्रावर निर्धारित वेळेनंतर पाेहाेचणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माेबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेचा आशय आढळल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत.
पेपरफुटींच्या अफवांना प्रतिबंध घालणे तसेच भयमुक्त आणि काॅपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगाेदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी - मार्च २०२३ पासून रद्द करण्यात येत असल्याचे परीक्षा मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
केव्हा मिळेल पेपर?
- ११ वाजता : सकाळच्या सत्रात
- ३ वाजता : दुपारच्या सत्रात
जीपीआरएस प्रणाली सुरू ठेवावी लागणार
- सर्व परीक्षा केंद्रांवर शिक्षण विभागाकडून नेमण्यात येणाऱ्या भरारी पथकाशिवाय भरारी पथके व बैठी पथके नियुक्त करण्यात येणार आहेत.
- मुख्य परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोहोचवण्याकरिता व उत्तरपत्रिका आणण्याकरिता नेमण्यात आलेल्या सहायक परीरक्षकांना प्रवासादरम्यान जीपीआरएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आले आहे.