Shirish Maharaj More: संत तुकाराम महाराजांच्या ११ व्या वंशजाने राहत्या घरी आयुष्य संपवलं; देहूत शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 13:16 IST2025-02-05T13:15:43+5:302025-02-05T13:16:20+5:30
Shirish Maharaj More: २० दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता. एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न होते. मात्र त्याआधीच त्यांचे निधन झाले आहे.

Shirish Maharaj More: संत तुकाराम महाराजांच्या ११ व्या वंशजाने राहत्या घरी आयुष्य संपवलं; देहूत शोककळा
पुणे - संताची नगरी देहूत धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रसिद्ध व्याख्याते शिरीष महाराज (Shirish Maharaj More) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. शिरीष महाराज हे शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. वयाच्या ३० व्या वर्षी शिरीष महाराजांनी घरात गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. या घटनेमुळे देहू परिसरात शोककळा पसरली असून आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नाही.
शिरीष महाराज मोरे यांचं नुकतेच लग्न ठरले होते. हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर ते कायम भाष्य करायचे. लव्ह जिहाद, लँन्ड जिहादसारख्या प्रकरणावर त्यांची व्याख्याने गाजली होती. संत तुकाराम महाराजांचे ते ११ वे वंशज होते. शिरीष महाराजांच्या या टोकाच्या निर्णयानं देहूत खळबळ माजली आहे. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा नावलौकीक होता.
नेहमीप्रमाणे रात्री जेवल्यानंतर शिरीष महाराज झोपायला गेले होते. मात्र सकाळी त्यांनी खोलीचे दरवाजे उघडले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी खोलीचा दरवाजा तोडल्यानंतर उपरण्याच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतल्याचं समोर आले. आर्थिक परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं नमूद करण्यात आले आहे. २० दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता. एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न होते. मात्र त्याआधीच त्यांचे निधन झाले आहे.
*संत तुकाराम महाराजांचे वंशज,राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांचे आज आकस्मित निधन झाले*
— Nitesh Rane (@NiteshNRane) February 5, 2025
*मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देवो व आत्म्यास सदगती मिळो हिचं परमेश्वरा चरणी प्रार्थना...*
*ॐ शांती*
*भावपूर्ण श्रद्धांजली💐*… pic.twitter.com/LI7eFPSipU
दरम्यान, संत तुकाराम महाराजांचे वंशज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांचं आज आकस्मित निधन झालं असून मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देवो व आत्म्यास सदगती मिळो हिचं परमेश्वरा चरणी प्रार्थना अशी श्रद्धांजली मंत्री नितेश राणे यांनी वाहिली आहे.