धक्कादायक खुलासा! संजय राऊत धमकी प्रकरणी एकाला अटक; सुरक्षेसाठी रचला होता खोटा बनाव?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 04:19 PM2023-06-15T16:19:34+5:302023-06-15T16:21:07+5:30
पोलिसांकडून ही माहिती समोर येताच भाजपा-मनसेने संजय राऊतांवर निशाणा साधला.
मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना काही दिवसांपूर्वी धमकीचे फोन आले होते. त्याबाबत पोलिसांनी तपास करून या प्रकरणी मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांना या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मयूर शिंदे हा सुनील राऊतांचाच निकटवर्तीय असल्याची चर्चा असून राऊतांची सुरक्षा वाढावी यासाठी हा बनाव रचल्याचं बोलले जात आहे.
मुंबई पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी ४ आरोपींना अटक केली असून मयूर शिंदे हा संजय राऊतांच्याही जवळचा आहे. संजय राऊतांची सुरक्षा वाढावी यासाठी मयूर शिंदेने हा बनाव रचला. मयूर शिंदेने स्वत: फोन केला नव्हता तर इतर साथीदारांना फोन करायला सांगितले. मयूर शिंदे हा या प्रकरणाचा मुख्य आरोपी असून त्याला पोलिसांनी अटक केली.
भाजपा-मनसेचा राऊतांवर निशाणा
पोलिसांकडून ही माहिती समोर येताच भाजपा-मनसेने संजय राऊतांवर निशाणा साधला. भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले की, संजय राऊत यांचा तीन पैशांचा तमाशा लोकांच्या समोर आला आहे. ज्या प्रकारे मयूर शिंदेला अटक केली. खोटी धमकी दाखवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची, सरकारची, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलीस आयुक्ताना विनंती आहे मयूर शिंदे कोण आहे कुठल्या गँगस्टरशी संबंध आहे? संजय राऊत याला साथ का देत आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे. संजय राऊत यांच्यावर सरकारची जनतेची पोलिसांची धोकाधडी खोटारडेपणा असे गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्यांनी केली.
तर संजय राऊत यांना जेव्हा धमकी दिली तेव्हा मी ट्वीट केलं होत कार्तिक कॉलिंग कार्तिक असा चित्रपट आला होता, तसेच संजय राऊत कॉलिंग राऊत आहे. ज्यांनी धमकी दिली तो ह्या दोन्ही राऊत बंधूंचा अत्यंत जवळचा साथीदार आणि गैंगस्टर आहे. म्हणजे हे दोघं लबाड सोबत मूर्ख पण आहेत. कोणाकडून धमकीचा फोन करुन घ्यावा हे कळत नाही. सुरक्षा मिळावी म्हणून हा प्रयत्न होता. आगामी काळात जनता यांना लाथा मारल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांना टार्गेट केले.
संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर लावले आरोप
मयूर शिंदे हा सध्या भाजपा किंवा मिन्धे गटात असल्याचे समजले. कधी काळी जवळ असलेल्या व्यक्तींचा वापर केला जातो. एकनाथ शिंदे या जवळच्या व्यक्तीस पकडून शिवसेनेचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला तसा...राजा ठाकूर प्रकरण फसल्यावर हे घडवले काय? काही विषय संवेदनशील असतात. याचे भान नसलेले लोकच असे बोलू आणि लिहू शकतात असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले.