Sanjay Raut PC: भविष्यात शिवसेनेवर स्वबळावर लढण्याची वेळ येऊ शकते; संजय राऊतांच्या विधानानं चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 02:06 PM2022-03-22T14:06:38+5:302022-03-22T14:07:15+5:30

ज्याठिकाणी भाजपाचं राज्य नाही, मुख्यमंत्री नाहीत तिथेच ईडीच्या धाडी पडल्या जातात. महाराष्ट्र असो वा बंगाल. या तपास यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागत आहेत असा आरोप राऊतांनी केला.

In future, it may be time to fight Shiv Sena on its own says Shivsena MP Sanjay Raut | Sanjay Raut PC: भविष्यात शिवसेनेवर स्वबळावर लढण्याची वेळ येऊ शकते; संजय राऊतांच्या विधानानं चर्चा

Sanjay Raut PC: भविष्यात शिवसेनेवर स्वबळावर लढण्याची वेळ येऊ शकते; संजय राऊतांच्या विधानानं चर्चा

googlenewsNext

नागपूर – आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा भगवा झेंडा महाराष्ट्रात फडकल्याशिवाय राहणार नाही असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी केले होते. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी नागपूरात प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाचा भगवा झेंडा आहे की नाही हे माहिती नाही. परंतु शिवसेनेचा भगवा झेंडा आहे. भगव्याचा झेंडा आणि दांडा फक्त शिवसेनेचा आहे. महाविकास आघाडीत असलो तरी शिवसेनेने हिंदुत्व सोडलं नाही असं राऊतांनी ठणकावून सांगितले आहे.

त्याचसोबत भारतीय जनता पक्ष २०२४ च्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणेल या देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर संजय राऊतांनीही सूचक वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस(BJP Devendra Fadnavis) भाजपाचे राज्यातील नेते आहेत. स्वबळावर लढायचं की नाही ते त्यांनी ठरवावं. भविष्यात आमच्यावरही स्वबळावर लढण्याची वेळ येऊ शकते. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असं राऊतांनी सांगितले.

विधिमंडळात पेनड्राईव्ह देणे त्याला बॉम्ब मानत नाही

माझ्यासारख्या माणसाला ईडीचं भय दाखवण्याचा प्रयत्न झाला. माझ्या कुटुंबावर धाडी टाकल्या. पण काय मिळालं? ज्याठिकाणी भाजपाचं राज्य नाही, मुख्यमंत्री नाहीत तिथेच ईडीच्या धाडी पडल्या जातात. महाराष्ट्र असो वा बंगाल. या तपास यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागत आहेत. त्यांना वापरलं जात आहे. आम्ही झुकणार नाही. शिवसेनेला वाकवू शकत नाही. महाविकास आघाडीला हात लावू शकत नाही. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. ज्याची भीती आणि दहशत दोन्ही असते. मी हजारोंच्या साक्षीने ईडीच्या भ्रष्टाचाराचं १३ पानी पुराव्यासह पत्र दिले. ईडीचे अधिकारी ६०-७० बिल्डरांकडून खंडणी वसूल केल्या हा बॉम्ब नाही का? विधिमंडळात पेनड्राइव्ह पुरावे देणे त्याला बॉम्ब मानत नाही असा टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

भाजपा सूडाचं राजकारण करतंय

आमच्या नेत्यांना अडकवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर होत आहे. नवाब मलिक मंत्रिमंडळात राहणारच आहे. तुमच्याकडे केंद्रीय यंत्रणा तर महाराष्ट्र पोलीसही आता काम करत आहे. भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. तपास सुरू झाला आहे. महाराष्ट्र पोलीस हा तपास करण्यास सक्षम आहे. लवकरच भ्रष्टाचारी जेलमध्ये जातील. अनिल देशमुखांबाबत घाईघाईनं राजीनाम्याचा निर्णय झाला असं मला वाटतं. ईडी,सीबीआय धाडी टाकल्या जातात. देशभरात भाजपा सूडाचं राजकारण करत आहे. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही. मी १०० च्या वर प्रकरणं ईडीकडे पाठवली आहेत. ईडीनं गेल्या ७ वर्षात हजारो कारवाया केल्या त्यातील १९ लोकांवरच आरोप सिद्ध झालेत. तपास यंत्रणांचा वापर करून सरकार पडणार नाही असा इशाराही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.  

Web Title: In future, it may be time to fight Shiv Sena on its own says Shivsena MP Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.