महाडमध्ये शिंदे-ठाकरे गटात झाला जोरदार राडा; आमदार भरत गोगावलेंची निषेध फेरी रोखल्याने तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 09:25 AM2023-12-23T09:25:27+5:302023-12-23T09:25:45+5:30
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने भरत गोगावले यांचा पुतळा जाळून निषेध केला जाणार होता. तत्पूर्वी, शिंदे गटाच्या भरत गोगावले समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गर्दी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाडमध्ये शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी निषेध रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, हा निषेध शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी रोखला. यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन गटांत जोरदार राडा झाला. परिसरात तणावाचे वातावरण होते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने भरत गोगावले यांचा पुतळा जाळून निषेध केला जाणार होता. तत्पूर्वी, शिंदे गटाच्या भरत गोगावले समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गर्दी केली. गोगावले समर्थकांनी जर उद्धव गटाच्या वतीने निषेध व्यक्त झाला तर त्यांचे कार्यालय फोडू, असा पवित्रा घेतला. यामुळे दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने आले.
एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाण
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी गोगावले समर्थकांनी फळी उभी केली. दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना दोन्ही गट आमने-सामने आले. एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाण झाली. यावेळी दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
...अखेर महिला पोलिस कर्मचाऱ्याने घातला महाराजांना पुष्पहार
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चोख पोलिस बंदोबस्त होता. मात्र, दोन्ही गटांकडून एकमेकांवर धावून जाण्याचे प्रकार घडले. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यावरून चढाओढ झाली. दोन तासांच्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर पोलिसांना पुतळा परिसर ताब्यात घेण्यात यश आले. जमलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करून एका पोलिस कर्मचारी महिलेने छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातला. जवळपास शिवाजी महाराज चौकामध्ये दोन तास दोन्ही गटांत राडा सुरू राहिला. माणगाव पोलिस उपविभागीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जमावाला पांगविण्यात यश मिळविले.