महाराष्ट्रात 172 मेंदूमृतांनी दिले 457 रुग्णांना जीवदान; अवयवदानात पुणे विभाग अव्वल, छ. संभाजीनगर मागे
By संतोष आंधळे | Updated: January 2, 2025 13:48 IST2025-01-02T13:45:32+5:302025-01-02T13:48:46+5:30
राज्यात यावर्षी पुणे विभागातून सर्वाधिक ७० मेंदूमृत अवयवदान झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत अवयवदानाचा आकडा वाढला असला, तरी मेंदूमृत अवयवदानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात 172 मेंदूमृतांनी दिले 457 रुग्णांना जीवदान; अवयवदानात पुणे विभाग अव्वल, छ. संभाजीनगर मागे
संतोष आंधळे -
मुंबई : गेल्या काही वर्षांत अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत. त्यामुळे अवयव निकामी असणाऱ्या रुग्णांमध्ये आशेची नवीन उमेद निर्माण झाली आहे. त्यामुळे अवयवांसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांची प्रतीक्षा यादी वर्षागणिक मोठी होत आहे. यावर्षी २०२४ मध्ये राज्यात १७२ मेंदूमृत अवयवदात्यांनी अवयवदान केल्यामुळे ४५७ रुग्णांना जीवदान मिळाले आहे.
राज्यात यावर्षी पुणे विभागातून सर्वाधिक ७० मेंदूमृत अवयवदान झाले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत अवयवदानाचा आकडा वाढला असला, तरी मेंदूमृत अवयवदानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या चार विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समित्यांकडून मेंदूमृताकडून मिळणाऱ्या अवयवाच्या नियमनाचे काम करण्यात येते. त्यांच्याकडे त्यांच्या विभागातून अवयवांसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांची नोंदणी केलेली असते. त्यानुसार अवयव प्राप्त झाल्यानंतर त्या क्रमवारीने अवयवांचे वाटप करण्यात येते. तसेच राज्यात राज्य अवयव आणि उती पेशी प्रत्यारोपण संस्था या सर्वांच्या कामावर देखरेख करण्याचे काम करत असते.
सन २०२३ मध्ये राज्यात १४९ जणांचे अवयवदान झाले होते. मात्र, २०२४ मध्ये वाढ झाली. यंदा १७२ जणांचे अवयवदान केले. यावेळी हा आकडा २३ने वाढला आहे.
सरकारी रुग्णालयात अनास्था
राज्यातील बहुतांश मेंदूमृत अवयवदान हे खासगी रुग्णालयांतून होते. मात्र, फारच कमी प्रमाणात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रुग्णालयांत होत असते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सार्वजनिक रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात मेंदूमृत रुग्ण असतात. मात्र, या रुग्णालयांत पुरेसे वैद्यकीय बळ नसल्यामुळे अनेकवेळा अवयवदान होत नाही. तसेच काही विशिष्ट रुग्णालये सोडली तर सरकारी रुग्णालयांत अवयवदान व्हावे, यासाठी फारसे प्रयत्न केले जात नाहीत.
यंदा राज्यात अवयवदानाचा आकडा वाढला असला, तरी अजूनही मोठ्या प्रमाणात अवयवदान होण्याची गरज आहे. कारण रुग्णांची प्रतीक्षा यादी मोठी आहे. खासगी रुग्णालये चांगले काम करत आहेत. सरकारी रुग्णालयांनीही अवयवदानासाठी काम करणे गरजेचे आहे. शासनाने या रुग्णालयांना मनुष्यबळ दिले पाहिजे.
- डॉ. भरत शाह, सरचिटणीस, मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती
- राज्यात अवयवदानात पहिल्या क्रमांकावर पुणे विभाग तर त्या खालोखाल मुंबई विभागाचा क्रमांक आहे. तर सर्वांत कमी अवयवदान छत्रपती संभाजीनगर विभागात झाले आहे.
२०२४ मधील अवयवदान
विभाग अवयवदाते प्राप्त अवयव
पुणे ७० १८१
मुंबई ६० १६२
नागपूर ३९ १०५
छ. संभाजीनगर ३ ९