महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा ‘महिला’वार, अनेक महिला उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 07:27 AM2024-04-05T07:27:18+5:302024-04-05T07:27:38+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: राज्याच्या राजकारणात गुरुवार हा ‘महिला’वार ठरला.
मुंबई - राज्याच्या राजकारणात गुरुवार हा ‘महिला’वार ठरला. सर्वोच्च न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरविल्यानंतर काही तासांतच त्यांनी जल्लोषात उमेदवारी अर्ज भरला. नांदेड-हिंगोलीमार्गे येऊन राजश्री पाटील यांनी यवतमाळ-वाशिममध्ये शिंदेसेनेकडून अर्ज भरला. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना यांनी अजित पवार गटात प्रवेश केला, आता त्या तिथे उमेदवार असतील. बीडमध्ये तिकिटाचा विश्वास असलेल्या ज्योती मेटे यांची मात्र निराशा झाली.
अमरावतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. राजश्री पाटील यवतमाळमधील आपल्या माहेरघरी गेल्या तेव्हा आईवडिलांच्या आठवणीने त्यांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. उमेदवारी नाकारण्यात आलेल्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी या राजश्री पाटील यांचा अर्ज भरताना हजर नव्हत्या, हा राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरला. अमरावती मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर केली होती.
मात्र, गुरुवारी शेवटच्या दिवशी त्यांनी अर्जच भरला नाही. वंचितने त्या ठिकाणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला. आनंदराज यांनी रिपब्लिकन सेनेतर्फे अर्ज भरला. ते रिंगणात कायम राहतात का, याबाबत उत्सुकता आहे.