सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 03:45 PM2024-10-07T15:45:48+5:302024-10-07T16:00:17+5:30

गेल्या काही दिवसांपासून सांगलीतील राजकारणात आजी माजी खासदारांमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे. त्यातच आज एका कार्यक्रमात हे दोन्ही नेते उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. 

In Sangli Tasgaon clashes between MP Vishal Patil and former MP Sanjaykaka Patil | सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?

सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?

सांगली - तासगाव येथील एका कार्यक्रमात आजी-माजी खासदार यांच्यात चांगलीच जुंपल्याचे दिसून आले. तासगाव नगरपालिका इमारतीच्या उद्धाटन सोहळ्यात माजी खासदार संजयकाका पाटील आणि विद्यमान खासदार विशाल पाटील हे आमनेसामने आले. यावेळी झालेल्या वादात विशाल पाटील संतापले होते, त्यावर संजयकाका पाटीलही आक्रमक झाले. हा वाद इतका वाढला की दोन्ही गटाचे समर्थक पुढे आले. 

कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत तासगाव नगरपालिकेच्या इमारतीचा उद्धाटन सोहळा होता. यावेळी संजयकाका पाटील आणि खासदार विशाल पाटीलही हजर होते. या कार्यक्रमावेळी झालेल्या भाषणावरून या दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला. एकाबाजूला संजयकाका पाटील भाषण देत होते तेव्हा विशाल पाटील आक्रमकपणे त्यावर आक्षेप घेताना दिसले. यावेळी कार्यकर्ते स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकतेच विशाल पाटील यांनी तासगाव मतदारसंघात रोहित पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता. तेव्हापासून संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या. 

तासगाव रिंग रोडच्या मिळालेल्या मंजुरीवर विशाल पाटील यांनी भाषणात मुद्दा उचलला. त्यावर संजयकाका पाटील यांनी त्यांच्या भाषणातून आक्षेप घेतला. त्यानंतर विशाल पाटील उभे राहून संजयकाका पाटील यांच्या आरोपांना उत्तर देऊ लागले. यावेळी दोन्ही नेते आमनेसामने आले. तेव्हा संजयकाका पाटील समर्थकही आक्रमक झाले ते व्यासपीठावर विशाल पाटलांच्या दिशेने पुढे आले. तेव्हा काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. आजी माजी खासदारांच्या या वादावरून येत्या विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्याचं राजकारण पेटणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. 

नुकतेच तासगाव-कवठेमहांकाळमध्ये खासदार विशाल पाटील यांनी एका बाजूला अजितराव घोरपडेंना पाठिंबा दिला, तर काही तासातच रोहित पाटील यांच्या समर्थनाची भूमिका घेतली. खानापूरमध्ये सुहास बाबर व वैभव पाटील यांना स्वतंत्रपणे भेटून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. जतमध्ये विलासराव जगताप यांची सलगी करून विक्रम सावंत यांच्याविरोधात भूमिका घेतली. सांगलीत पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील यांच्यात संघर्ष निर्माण करून स्वार्थी भूमिका घेतली. विश्वजित कदम यांना नेता मानायचे अन् त्यांना अडचणीत आणण्याचा उद्योगही करायचा, अशा भूमिका ते घेत आहेत असा आरोप माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केला होता. 
 

Web Title: In Sangli Tasgaon clashes between MP Vishal Patil and former MP Sanjaykaka Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.