Dhananjay Munde : "महागाईच्या जमान्यात 1 रुपयात पेन्सिल तरी मिळते का?"; धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 03:52 PM2023-01-03T15:52:46+5:302023-01-03T15:59:28+5:30

Dhananjay Munde : सावित्री माईंच्या नावाने दिल्या जाणाऱ्या या भत्त्याची एक रुपया रक्कम ही शालेय मुलींची चेष्टा करणारी असल्याचे धनंजय मुंडे आपल्या पत्रात म्हणतात.

"In the age of inflation, does one even get a pencil for Rs 1?"; Dhananjay Munde's question to the government | Dhananjay Munde : "महागाईच्या जमान्यात 1 रुपयात पेन्सिल तरी मिळते का?"; धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

Dhananjay Munde : "महागाईच्या जमान्यात 1 रुपयात पेन्सिल तरी मिळते का?"; धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

googlenewsNext

मुंबई - राज्यात पहिली ते चौथीत शिकणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती आदी प्रवर्गातील सावित्रीच्या लेकींना मागील 30 वर्षांपासून नियमित शाळेत येण्यासाठी दिले जाणारे दैनंदिन 1 रुपया प्रोत्साहनपर अनुदान वाढवून प्रतिदिन किमान 20 रुपये करावे, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. 

त्याबाबत धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली असून आजच्या या महागाईच्या जमान्यात एक रुपयात साधी पेन्सिल तरी मिळते का? असा प्रश्न उपस्थित करत, सावित्रीमाईंच्या जयंतीच्या निमित्ताने या योजनेचे पुनरावलोकन करून अनुदान प्रतिदिन किमान 20 रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांनी लिहिलेल्या पत्रात, सन 1992 साली तत्कालीन राज्य सरकारने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून व त्यांनी दाखवलेला स्त्री शिक्षण व सक्षमीकरणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आदिवासी क्षेत्राबाहेरील आर्थिक दुर्बल घटकातील तसेच अनुसूचित जाती- जमाती व भटक्या जमातींमधील पहिली ते चौथी मध्ये शिकणाऱ्या मुलींची पटसंख्या वाढावी तसेच गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने पहिली ते चौथीत शिकणाऱ्या मुलींना प्रोत्साहन पर उपस्थिती भत्ता देण्यासाठी 'दुर्बल घटकातील मुलींना शाळेत नियमित येण्यासाठी उपस्थिती भत्ता' देण्याचा शासन निर्णय घेतला होता. यांतर्गत प्रति विद्यार्थिनी, प्रतिदिन 1 रुपया प्रमाणे भत्ता निश्चित करण्यात आलेला असून, वर्षातील एकूण उपस्थितीचे 220 दिवस ग्राह्य धरून याप्रमाणे भत्ता दिला जातो. 

सदर योजनेतील भत्ता वितरित करण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये अद्याप निधीही उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती निदर्शनास आली आहे. मागील सुमारे तीस वर्षांपासून या योजनेत काहीही बदल करण्यात आलेले नाहीत. देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करत असताना दुसरीकडे महागाई आकाशाला गवसणी घालत आहे. अशा परिस्थितीत सावित्री माईंच्या नावाने दिल्या जाणाऱ्या या भत्त्याची एक रुपया रक्कम ही शालेय मुलींची चेष्टा करणारी असल्याचे धनंजय मुंडे आपल्या पत्रात म्हणतात.

आजच्या बाजार भावानुसार एक रुपयात एक पेन्सिल मिळणे सुद्धा दुरापास्त आहे. असे असताना शालेय मुलींना उपस्थिती प्रोत्साहन देण्यासाठी दिला जाणारा तुटपुंजा भत्ता देखील वाढविण्याची गरज असल्याचेही पुढे पत्रात म्हटले आहे. आज सावित्री माईंची जयंती आपण उत्साहात साजरी करत आहोत, सावित्री माईंनी सामाजिक विरोध झुगारून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलींना ज्ञानदानाचे पवित्र काम करून स्त्री शिक्षणाची दारे खुली केली. याच पार्श्वभूमीवर बालिका दिनाचे निमित्त साधून शासनाने वरील योजना सुरू केलेली आहे.

सध्याच्या आधुनिक युगात देश डिजिटायझेशन कडे वाटचाल करत असताना शिक्षण व त्याला पूरक साधनांमध्ये देखील आमूलाग्र बदल झाले आहेत. या बदलांना अनुसरून व आधुनिक शिक्षण पद्धतींचा अवलंब करून प्राथमिक शिक्षण प्राप्त करण्यासाठी उपरोक्त योजनेचे पुनरावलोकन करून त्यात बदल करणे गरजेचे आहे. तसेच यांतर्गत मुलींना दिला जाणारा दैनंदिन भत्ता 1 रुपयावरून वरून प्रतिदिन किमान 20 रुपये करणे देखील गरजेचे आहे असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने या योजनेचे पुनरावलोकन करून दैनंदिन भत्ता वाढ करण्यासाठी राज्य शासन स्तरावरून एका बैठकीचे तातडीने आयोजन करून निर्णय घ्यावा, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: "In the age of inflation, does one even get a pencil for Rs 1?"; Dhananjay Munde's question to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.