मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 06:41 AM2024-10-05T06:41:12+5:302024-10-05T06:41:32+5:30
रखडलेल्या पेसा भरतीसाेबतच धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देऊ नये या मागण्यांसाठी आदिवासी लाेकप्रतिनिधी आक्रमक झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आदिवासींच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मिळत नसल्याने राज्यातील आदिवासी आमदारांनी शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत मंत्रालयात प्रचंड गोंधळ घातला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह काही आमदारांनी थेट मंत्रालयातील जाळीवर उड्या घेत संताप व्यक्त केला. अनेक तासांच्या या गदारोळानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत पेसा भरती करण्याचे आश्वासन मिळाले.
रखडलेल्या पेसा भरतीसाेबतच धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देऊ नये या मागण्यांसाठी आदिवासी लाेकप्रतिनिधी आक्रमक झाले.
आमदारांच्या उड्या अन् सामान्यांना पडलेले प्रश्न
nमंत्रालयातील जाळीवर उडी मारणाऱ्या सर्वसामान्यांवर पोलिस गुन्हा दाखल करतात. या आमदारांच्या विरोधात गुन्हा का नोंदविला नाही?
nआंदोलक आमदारांना बोलावून लगेच आश्वासन देणारे राज्य सरकार सामान्यांनाही असाच न्याय देणार का?
nसत्तेत असताना आदिवासींचे प्रश्न सोडविता का आले नाही?
nनिवडणुकीसाठी ही स्टंटबाजी कितपत योग्य आहे?
nविधानसभा उपाध्यक्ष पदावरील व्यक्तीने असे आंदोलन करावे का?
मुख्यमंत्र्यांनी दिले भरतीचे आश्वासन
परीक्षा उत्तीर्ण झालेत पण नियुक्ती नाही, अशी पेसा अंतर्गत असलेली ९ हजार पदे भरण्यास मान्यता दिली जाईल. तसेच, न्यायालयाचा निकाल पेसा भरतीच्या विरोधात गेला, तर अधिसंख्य पदे निर्माण करून आदिवासी तरुणांची भरती केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदिवासी आमदारांंबरोबर नंतर झालेल्या बैठकीत दिले.
जाळीवर कोणी उड्या मारल्या?
nविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ.
nकाँग्रेसचे हिरामण खोसकर.
nबहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील.