भाजपा महिला आमदाराचा सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव; विधानसभेत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 02:17 PM2023-12-19T14:17:02+5:302023-12-19T14:17:49+5:30

माझ्याकडे असलेली ड्रग्स पेडलरची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर सोलापूरपासून नाशिकपर्यंत ड्रग्सचे कारखाने उघडकीस आले असं आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या.

In the Nagpur session, BJP MLA Devyani Farande raised a proposal for violation of rights against Sushma Andhare | भाजपा महिला आमदाराचा सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव; विधानसभेत काय घडलं?

भाजपा महिला आमदाराचा सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव; विधानसभेत काय घडलं?

नागपूर - ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात भाजपाच्या नाशिक येथील महिला आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. एका निनावी पत्राचा हवाला देत सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत फरांदेंवर आरोप केले होते. त्यावरून आमदार देवयानी फरांदे यांनी अंधारेंवर सभागृहात हल्लाबोल केला.

आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की, उबाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या गल्लीबोळात लढणाऱ्या नेत्या असतील परंतु त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या निनावी पत्रावरून पुण्यात माझ्याविरोधात पत्रकार परिषद घेतली. मी गेली ३० वर्ष राजकारणात विविध पदांवर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतेय. मी आजपर्यंत कुणावरही पुरावा नसताना आरोप केला नाही. या ताईंकडे काही पुरावे असतील तर त्यांनी गृहमंत्र्यांना द्यावे. सुषमा अंधारे यांनी १८ नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी त्याच दिवशी गृहमंत्र्यांना पत्र देऊन आरोपांची चौकशी करावी अशी मागणी केली.पोलीस आयुक्तांनाही पत्र दिले. गेली ४ अधिवेशन मी सातत्याने ड्रग्सविरोधात लढा देतेय. नाशिकला ड्रग्समुक्त करण्यासाठी लढतेय असं त्यांनी सांगितले. 

तसेच माझ्याकडे असलेली ड्रग्स पेडलरची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर सोलापूरपासून नाशिकपर्यंत ड्रग्सचे कारखाने उघडकीस आले. मी या विषयावर सातत्याने बोलतेय. मात्र ललित पाटील हे उबाठा सेनेचे असल्याने माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. याबाबत मी पुराव्यासह विधानसभेत हक्कभंग सुषमा अंधारेंवर दाखल करावा अशी मागणी केली. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी माझ्याकडे तुम्ही प्रस्ताव सादर करा. मी तपासून उचित निर्णय घेईल असं आश्वासन दिले. 

काय केले होते सुषमा अंधारे यांनी आरोप?
ललित पाटील ड्रग्स प्रकरणी मला निनावी पत्र प्राप्त झाले. ती मी पुणे पोलिसांना दिले आहे. पत्रात जे संदर्भ दिलेत त्यात कुठलाही पुरावा नाही. या पत्रात छोटी भाभी उर्फ शेख याला अटक केली तर बडी भाभी कोण? असा म्हणत अंधारेंनी अप्रत्यक्षपणे देवयानी फरांदे यांच्याकडे बोट दाखवले होते. 
 

Web Title: In the Nagpur session, BJP MLA Devyani Farande raised a proposal for violation of rights against Sushma Andhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.