आगामी निवडणुकीत 'तोच' फॉर्म्युला कायम राहील, त्यात...; शिवसेनेचा BJP ला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 02:14 PM2023-03-24T14:14:52+5:302023-03-24T14:18:00+5:30
महाविकास आघाडीसोबत विशेषत: उद्धव ठाकरेंचे राष्ट्रवादीसोबत जाणे हे आम्हाला शिवसेनेच्या प्रवासासाठी घातक वाटले असा आरोप खासदार गजानन किर्तीकर यांनी केला.
नवी दिल्ली - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यात शिंदे-ठाकरे संघर्ष पाहायला मिळाला. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची पक्षबांधणी सुरू झाली. मात्र तोच शिंदे गटाला केवळ ४८-५० जागा निवडणुकीत दिल्या जातील असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्यावरून आता नुकतेच संसदीय नेतेपदी निवड झालेल्या खासदार गजानन किर्तीकरांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.
खासदार गजानन किर्तीकर म्हणाले की, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा २०१९ ला एकत्र लढली. महाराष्ट्रात १२६ शिवसेना आणि १६२ जागा भाजपा लढली. त्यातील भाजपाचे १०२ तर आमचे ५६ आले. लोकसभेलाही ४८ पैकी २२-२६ फॉर्म्युला होता. हाच फॉर्म्युला तसाच राहिला पाहिजे. काही जागांवर चर्चा होईल. परंतु आकडा बदलणार नाही. ही शिवसेना इतकी कमजोर नाही हे लक्षात ठेवावे असं त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज
बाळासाहेबांची शिवसेना आमच्या मनात कोरली आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीचा आम्हाला त्रास होत होता. बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेतली जात होती. आम्ही वारंवार सांगत होतो पण बदल होत नव्हता. काही ठराविक लोकांनी त्यांना घेरले होते. त्यापद्धतीची कार्यपद्धती सुरू होती. आम्ही बाळासाहेबांसोबत काम केले आहे. अमोल आदित्य ठाकरेंसोबत काम करतोय त्यामुळे त्याला काही माहिती नाही. मी इतकी वर्ष शिवसेनेत स्थापन झाल्यापासून काम करतोय. संघटना बांधणीसाठी काम करतोय हा अनुभव घेतल्यानंतर शिवसेना आमच्या मनातील पुसट होत चालली होती. महाविकास आघाडीसोबत विशेषत: उद्धव ठाकरेंचे राष्ट्रवादीसोबत जाणे हे आम्हाला शिवसेनेच्या प्रवासासाठी घातक वाटले. या सर्व गोष्टीचा आम्हाला त्रास होत होता म्हणून आम्ही हा उठाव केला असं गजानन किर्तीकरांनी म्हटलं.
शिवसेनेचा व्हिप 'त्यांना' लागू होत नाही
शिवसेना जो पक्ष आहे ज्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. आता हा पक्ष NDA चा घटक पक्ष व्हावा यासाठी संजय राऊतांना काढावे लागले. त्यांच्याजागी माझी नेमणूक करावी लागली. हा तांत्रिक मुद्दा आहे. लोकसभेत १३ खासदार स्वखुशीने सभापतींना पत्र देऊन शिवसेनेत आले. राज्यात सत्तासंघर्ष झाला. व्हिप लागू होत नाही हे माझे मत आहे. परंतु विधिज्ञ जास्त अनुभवाने सांगतील असंही किर्तीकरांनी सांगितले आहे.