दोन दिवसांत तिप्पट वाढले अवकाळीचे नुकसान क्षेत्र, राज्यातील चार लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 09:58 AM2023-12-01T09:58:24+5:302023-12-01T09:58:42+5:30
Unseasonal Rain In Maharashtra: राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार २२ जिल्ह्यातील चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
मुंबई - राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार २२ जिल्ह्यातील चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात २६ ते २८ नोव्हेंबर या तीन दिवसांत झालेल्या अवकाळीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राची ही आकडेवारी असून दोन दिवसांतच हा आकडा तिप्पट वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी १६ जिल्ह्यातील अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे जाहीर करण्यात आले होते.
दोन दिवसांपूर्वीच्या आकडेवारीनुसार बुलढाणा आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले होते. मात्र, नव्याने समोर आलेल्या आकडेवारीनुसार यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून त्या खालोखाल हिंगोली, बुलढाणा जिल्ह्याचा क्रमांक आहे. शासनाच्या अंदाजानुसार हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाचा फेरा
अकोला: पश्चिम विदर्भात चौथ्या दिवशीही अवकाळी पाऊस सुरूच आहे. वऱ्हाडात कापूस, तूर पिकाचे मोठे नुकसान झाले असून वाशिम जिल्ह्यात २५ मेंढरांचा गाळात फसून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अकोला, बुलढाणासह वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. भाजीपाला आणि रब्बी पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
मंत्री शेतात गेले तरच भले होते का? जरांगेंचा सवाल
वडीगोद्री (जि. जालना) : मंत्री शेतात पाहणी करण्यासाठी गेले तरच शेतकऱ्यांचे चांगले होते असे काही नाही. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून अहवाल द्यावा. शासनाने तातडीने मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी केली. मंत्री भुजबळ यांच्या नुकसानग्रस्त पीक पाहणीवेळी मराठा समाजाने विरोध दर्शविला होता.