शेतकऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव
By admin | Published: June 28, 2017 01:53 AM2017-06-28T01:53:25+5:302017-06-28T01:53:25+5:30
काँग्रेस आघाडी सरकारने संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची ५२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. मग केवळ राज्यातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी कशी?
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : काँग्रेस आघाडी सरकारने संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची ५२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. मग केवळ राज्यातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी कशी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांसह इतर वर्गाची दिशाभूल करत असून या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
राज्य सरकार कर्जमाफीच्या आकड्याचा खेळ करत आहे. ९० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाल्याचा भुलभुलय्या सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या आकडेवारीचा हिशेबच लागत नाही. चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होऊन ४५ लाख नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ होणार असून आतापर्यंतच्या कर्जमाफीपेक्षा सर्वांत मोठी कर्जमाफी केल्याचा दावा सरकार करत आहे.
कॉँग्रेस आघाडी सरकारने २००८ ला संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. त्यामध्ये तर २०-२० लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. किती शेतकऱ्यांना नेमका कर्जमाफीचा लाभ झाला, असा प्रश्न संसदेत केल्यानंतर तत्कालीन अर्थमंत्र्यांनी ५२ हजार कोटी
रुपयांचा लाभ झाल्याचे सांगितले होते. मग ३४ हजार कोटींचे कर्ज
माफ कसे केले, असा सवालही शेट्टी यांनी केला.
सदाभाऊंवरील कारवाईचा आज फैसला-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलूखमैदान तोफ, माजी प्रदेशाध्यक्ष व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाईचा आज, बुधवारी फैसला होणार आहे. ‘स्वाभिमानी’चे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे कार्यकारिणीची बैठक होत आहे. यामध्ये ६ जुलैपासून मध्य प्रदेश येथून निघणाऱ्या देशव्यापी जागृती यात्रेच्या नियोजनावर चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर सदाभाऊ खोत यांच्याबाबत जोरदार चर्चा होणार आहे. खोत यांच्यावर कारवाई करायची की त्यांना संघटनेत ठेवून त्यांची कोंडी करायची याबाबत संघटनेंतर्गत जोरदार चर्चा सुरू आहे.