साथीचे आजार रोखण्यास यंत्रणा अपुरी

By Admin | Published: May 17, 2016 01:43 AM2016-05-17T01:43:48+5:302016-05-17T01:43:48+5:30

चिकुनगुनिया व डेंगीसारख्या डासांपासून प्रसार होणाऱ्या साथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी महापालिकेने तितिकीशी प्रभावी व पुरेशी यंत्रणा राबवलेली नाही

Inadequate machinery to prevent pandemic | साथीचे आजार रोखण्यास यंत्रणा अपुरी

साथीचे आजार रोखण्यास यंत्रणा अपुरी

googlenewsNext


येरवडा : पुणे हे राज्यातील अतिशय महत्त्वाचे शहर आहे, मात्र चिकुनगुनिया व डेंगीसारख्या डासांपासून प्रसार होणाऱ्या साथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी महापालिकेने तितिकीशी प्रभावी व पुरेशी यंत्रणा राबवलेली नाही. पुण्याच्या तुलनेत मुंबई, सोलापूर व पिंंपरी-चिंचवडसारख्या शहरांसह राज्याच्या ग्रामीण भागामध्येही अशा रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना होत असल्या तरी शहरात रोगनियंत्रणासाठी आवश्यक असलेले सर्वेक्षण व त्यानंतरच्या उपाययोजनांसाठी आवश्यक कर्मचारी (आॅन फिल्ड स्टाफ) पुणे महापालिकेकडे कमी प्रमाणात आहे, त्यामुळेच कदाचित शहरात चिकुनगुनिया व डेंगीच्या रुग्णांचे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत जास्त असल्याचे मत राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारने यावर्षीपासून १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंगी दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात राज्यभर करण्यात आलेल्या उपाययोजना व उपक्रमांची माहिती देण्यासाठी विश्रांतवाडीजवळील आरोग्य विभागाच्या उपसंचालनालयामध्ये (परिवर्तन) आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. जगताप यांनी ही माहिती दिली. या वेळी सहायक संचालक डॉ. बाळकृष्ण कांबळे, डॉ. हेमंत जोशी, भावना चौधरी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, कीटकशास्त्रज्ञ बी. आर. माने उपस्थित होते.
पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. सोमनाथ परदेशींना आपण अनेक वेळा पत्रे पाठवून सूचना केल्या आहेत. तसेच आपल्या विभागाचे अधिकारी त्यांना भेटले आहेत, मात्र परदेशी त्यांची जबाबदारी कनिष्ठांवर ढकलतात, तसेच त्यांच्या कनिष्ठांकडूनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप डॉ. जगताप यांनी केला. (वार्ताहर)
।झिकाचा रुग्ण आपल्याकडे नाही
उत्तर अमेरिकेसारख्या थंड हवामान असलेल्या देशामध्ये आढळलेला झिका विषाणूचा रुग्ण अद्याप आपल्याकडे तरी दिसून आलेला नाही. त्यामुळे या विषाणूचा आपल्याकडे अजिबात प्रसार झालेला नाही. तरीही परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळ प्राधिकरण व राज्याच्या आरोग्य विभागाकडून तपासणी करण्याची खबरदारी घेतली जात असल्याचे कांचन जगताप यांनी सांगितले.
शहरी भागात जास्त रुग्ण चिकुनगुनिया व डेंगीचे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक रुग्ण आढळतात. यावर्षी जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यांत राज्यात डेंगीचे ५६४ रुग्ण आढळले आहेत, तर यामध्ये एकाचाही मृत्यू झालेला नाही. याच कालावधीत केरळमध्ये ९७९, तामिळनाडूत ८९४, कर्नाटकमध्ये ८६४ तर गुजरातमध्ये डेंगीचे ३३७ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ५६४ रुग्णांपैकी ग्रामीण भागातील २६९ तर शहरी भागातील ३९५ रुग्ण आहेत. सन २०१४ मध्ये राज्यात डेंगीचा उद्रेक झाला होता. त्यावर्षी राज्यात ८५७३ रुग्णांना डेंगी झाला तर यामध्ये १४४ जण दगावले होते. त्यानंतर केलेल्या उपाययोजनांमुळे सन २०१५ मध्ये डेंगीच्या रुग्णांचा आकडा ५११९ वर आला तर त्यावर्षी ३३ जण यामुळे दगावले होते.

Web Title: Inadequate machinery to prevent pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.