फेरीवाल्यांकडील ९६ टक्के बर्फ नमुने खाण्यास अयोग्य

By admin | Published: April 28, 2017 02:43 AM2017-04-28T02:43:42+5:302017-04-28T02:43:42+5:30

उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने हैराण झालेले मुंबईकर आपोआपच एखाद्या ज्यूस सेंटर, उसाच्या रसाचा स्टॉल आणि गोळेवाल्याकडे

Inappropriate to eat 96 percent of ice samples from hawkers | फेरीवाल्यांकडील ९६ टक्के बर्फ नमुने खाण्यास अयोग्य

फेरीवाल्यांकडील ९६ टक्के बर्फ नमुने खाण्यास अयोग्य

Next

मुंबई : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने हैराण झालेले मुंबईकर आपोआपच एखाद्या ज्यूस सेंटर, उसाच्या रसाचा स्टॉल आणि गोळेवाल्याकडे वळतात. अवघ्या १०-२० रुपयांत तहान भागविणाऱ्या या पेयांत आरोग्याला हानीकारक घटक असल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे. त्यामुळे केवळ ‘कूल’ होण्यासाठी या पेयांचे सेवन टाळावे. तसेच, जलजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी काळजी घेण्याचे महापालिकेद्वारे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने महापालिका क्षेत्रातील सर्व २४ विभागांमधील खाद्यपदार्थ व पेयपदार्थ विकणारे फ्रूट ज्यूस सेंटर, उसाच्या रसाचे स्टॉल्स, बर्फाचे गोळेवाले, लस्सी व ताक विक्रेते, फास्ट फूड सेंटर्स इत्यादी फेरीवाल्यांकडील बर्फ नमुने; तसेच उपाहारगृहातील बर्फाच्या नमुन्यांची चाचणी केली असता सरासरी ९६ टक्के बर्फ नमुने हे खाण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले आहे. तर याच नमुन्यांपैकी ७५ टक्के नमुन्यांमध्ये ‘ई-कोलाय’ जीवाणू आढळून आले आहेत. (प्रतिनिधी)
घरी शिजवलेले ताजे अन्न खा !
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जेवणापूर्वी व अन्न शिजवताना, तसेच शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत; घरी शिजवलेले ताजे अन्न खावे, हिरव्या पालेभाज्या - फळे स्वच्छ धुऊन खावेत, तसेच वैयक्तिक स्वच्छता काटेकोरपणे राखण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. मळमळ, उलटी, जुलाब यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी सूचना डॉ. पद्मजा केसकर यांनी केली आहे.
सर्वाधिक प्रमाण ‘एम पूर्व’ विभागात
महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये सरासरी ७५ टक्के बर्फ नमुन्यांमध्ये ई-कोलाय जीवाणू आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे गोवंडी, देवनार इत्यादी परिसरांचा समावेश असणाऱ्या ‘एम पूर्व’ या विभागात आढळून आले आहे. या विभागातील सर्वच्या सर्व म्हणजेच १०० टक्के बर्फ नमुन्यांमध्ये ई-कोलाय जीवाणू आढळून आले आहेत.
२७ टक्के पाणी नमुने अयोग्य, १० टक्के पाण्यात ‘ई-कोलाय’
खाद्य व पेय पदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांकडील पाणी नमुन्यांमध्येदेखील ‘ई-कोलाय’बाधित नमुने मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रातील सर्व २४ विभागांमध्ये सरासरी २७ टक्के पाणी नमुने हे पिण्यासाठी अयोग्य असल्याचे; तर सरासरी १० टक्के पाणी नमुने हे ई-कोलाय बाधित असल्याचे आढळून आले आहे.
हे टाळा...
महापालिका क्षेत्रातील बर्फ व पाणी नमुन्यांमध्ये आढळून आलेले ई-कोलाय जीवाणूंचे प्रमाण लक्षात घेता रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाऊ नयेत, बाहेरील पाणी - सरबत, उसाचा, फळांचा रस इत्यादी पिणे टाळावे, तसेच पाणीपुरी - भेळपुरीसारखे पदार्थ खाणेही टाळावे, असे आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आले आहे.
२४ पैकी १४ विभागांतील नमुने अयोग्य-
१ ते २५ एप्रिल २०१७ या कालावधीत महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रातील खाद्यपदार्थ व पेयपदार्थ विक्रेत्यांकडील बर्फ व पाणी नमुन्यांची चाचणी करण्यात आली.
या चाचणी दरम्यान महापालिकेच्या २४ पैकी १४ विभागांतील सर्व म्हणजेच १०० टक्के बर्फ नमुने हे खाण्यास वा पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
कार्यवाहीसाठी एफडीएला माहिती
खाद्य व पेय पदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांकडील बर्फ हा ‘आइस फॅक्टरी’मध्ये तयार होत असल्याने त्याबाबत कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाच्या ‘अन्न व औषध प्रशासन खात्या’ला कळविण्यात आले आहे, अशीही माहिती महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. केसकर यांनी दिली आहे.

Web Title: Inappropriate to eat 96 percent of ice samples from hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.