91 व्या मराठी साहित्य संमेलनाचे बडोद्यात थाटात उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 09:10 PM2018-02-16T21:10:36+5:302018-02-16T21:27:19+5:30

बडोदे येथील ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विजेते ज्येष्ठ गुजराती साहित्यिक डॉ. रघुवीर चौधरी यांच्या हस्ते संमेलनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी फडणवीस यांच्यासह राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, स्वागताध्यक्षा राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अंजली देशमुख, मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, गुर्जर साहित्यिक सितांशु यशचचंद्र, महाराजा समरजितसिंह गायकवाड, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, महापौर भरत डांगर आदी मान्यवर उपस्थित होते.

Inauguration of the 91st Marathi Sahitya Sammelan in Baroda | 91 व्या मराठी साहित्य संमेलनाचे बडोद्यात थाटात उद्घाटन

91 व्या मराठी साहित्य संमेलनाचे बडोद्यात थाटात उद्घाटन

googlenewsNext

प्रज्ञा केळकर-सिंग/ स्नेहा मोरे 
महाराजा सयाजीराव गायकवाड  साहित्यनगरी (बडोदे)  - मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी साहित्यिकांचे शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जाणार आहे. मराठी भाषा अभिजात आहेच; मात्र, त्यावर राजमुद्रा उमटण्याची गरज आहे, असे सांगतानाच पुढील वर्षीपासून राज्य शासनातर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अनुदान दुप्पट करून ते ५० लाख रुपये केले जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

बडोदे येथील ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विजेते ज्येष्ठ गुजराती साहित्यिक डॉ. रघुवीर चौधरी यांच्या हस्ते संमेलनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी फडणवीस यांच्यासह राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, स्वागताध्यक्षा राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अंजली देशमुख, मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, गुर्जर साहित्यिक सितांशु यशचचंद्र, महाराजा समरजितसिंह गायकवाड, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, महापौर भरत डांगर आदी मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, 'सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाचे पाईक अशी सयाजीराव गायकवाड यांची ख्याती आहे. त्यांच्या कर्मभूमीमध्ये संमेलन होत आहे, हे आपले भाग्य आहे. जेवढी साहित्य संमेलने मराठीत होतात, तेवढी इतर कोणत्याच भाषांमध्ये होत नाहीत. काळाशी सुसंगत साहित्य मराठीत निर्माण होत आहे. भाषा हा वादाचा नव्हे तर संवादाचा विषय आहे. संवाद वाढला की मानसिकता संकुचित न राहता विस्तारते. त्यामुळे माहिती, तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल अर्थव्यवस्था रुंदावत असताना त्यास सुसंगत असलेली ज्ञानभाषा निर्माण करावी लागेल. मराठीमध्ये कोणतेही आव्हान पेलण्याची क्षमता आहे.'

डॉ. रघुवीर चौधरी म्हणाले, 'देशात नवजागरणाची सुरुवात ज्ञानदेवांपासून झाली. आजचे सामाजिक, सांस्कृतिक प्रश्न सोडवायचे असतील तर महात्मा गांधी, विनोबा भावे, जयप्रकाश यांचे समरण करावे लागेल. सध्या भारतीय भाषाची दुर्दशा, उपेक्षा होत आहे. इंग्रजीला अनावश्यक महत्व दिले जात आहे. अशावेळी भारतीय भाषा बारावीपर्यंत अनिवार्य करणे गरजेचे आहे. भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आदानप्रदान कायम ठेवण्यासाठी जीवनदृष्टी आणि सर्जनशीलता वाढवणे गरजेचे आहे.'

'यंदाचे संमेलन विदर्भात व्हावे, यासाठी महामंडळाने आग्रह धरला असताना, मी बृहनमहाराष्ट्राचा आग्रह धरला' असे सांगत डॉ. काळे यांनी श्रीपाद जोशी यांना घरचा आहेर दिला. ते म्हणाले, 'मराठी अस्मिता, संरक्षण संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इंग्रजीच्या आक्रमणामुळे मराठी बोलण्यापुरती मर्यादित राहिली आहे. भाषा आजवर केवळ आंतरिक चेतनेमुळे टिकून राहिली आहे. भाषेच्या नैसर्गिक प्रतिकारक्षमतेवर अवलंबून राहण्यापेक्षा भाषेच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी पूर्व प्राथमिक शिक्षणापासून पदवीपर्यंत मराठी अनिवार्य करणे आवश्यक आहे.'

श्रीपाद जोशी म्हणाले, 'मुख्यमंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष एकाच भागात राहत असूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नाही, याचे लोकांना आशचर्य वाटत आहे.  मराठीच्या अभिजाततेची कागदपत्रे अद्याप केंद्राच्या दारात उभी आहे. मराठी विद्यापीठाची मागणीही प्रलंबित आहे. ११० वर्षानीही मराठीची स्थिती बिकटोत्तम आहे.  भाषेच्या रक्षणासाठी राजकीय पाठबळ, धोरण नाहीच; मात्र, लोकइच्छाशक्तीही महत्वाची आहे. मराठीची आणि साहित्याची वाट सुकर करण्यासाठी धोरणात बदल होणे आवश्यक आहे.' निवडणुका जवळ आल्या असून, आम्हाला उपकृत करण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे. हा प्रश्न सुटेपर्यंत तुमची सत्ता अबाधित राहो, असा टोलाही जोशी यांनी फडणवीस आणि तावडे यांना लगावला. 
 
साहित्याविना आयुष्य व्यर्थ आहे – भरत डांगर, महापौर (बडोदा)


८३ वर्षानंतर बडोद्यात साहित्य संमेलन आयोजित होतेय, याविषयी बडोद्याचा प्रथम नागरिक म्हणून अभिमान आहे. वाचनप्रेमींसाठी हे संमेलन म्हणजे साहित्याच्या आदान – प्रदानासाठी निश्चितच ही मोठी पर्वणी आहे. गेली अनेक वर्ष साहित्याची धुरा मराठी वाड्मय परिषद सांभाळत आहे, अशा आणखी साहित्य संस्थांची गरज आज समाजात आहे. नव्या पिढीची नाळ साहित्याशी जोडण्यासाठी याच संस्था प्रोत्साहित करीत असतात. आज प्रत्येकाने आपल्या आयुष्यात पुस्तकांशी, ग्रंथांशी नाते जोडले पाहिजे. कारण हेच नाते आपले आयुष्य समृद्ध करीत असते. साहित्याविना आयुष्य व्यर्थ आहे, मात्र अशा संमेलन पुन्हा वाचकांना साहित्याशी जोडेल, याची खात्री आहे.
 
 संमेलनातून दोन्ही राज्यांचे नवे अनुबंध निर्माण होतील – राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, स्वागताध्यक्ष

पंढरीचे वारकरी ज्याप्रमाणे नित्यनेमाने वारीला जातात. त्याप्रमाणे, आपणही या शारदेच्या यात्रेला भक्तगण आले आहेत. पंढरीच्या विठूमाऊलीची ज्याप्रमाणे कायम सेवा आपण करतो, त्याप्रमाणे या सरस्वतीची सेवा करत राहू अशी खात्री आहे. ज्या साहित्यात सत्य, सौंदर्य आणि हीत यांचे मिलन होते, ते खरे परिपूर्ण साहित्य होय. समाजात लेखनकला ही महत्त्वाची भूमिका पार पडत असते, कारण यातूनच श्रेष्ठ कलाकृती निर्माण होत असतात. महाराजा गायकवाड महाराष्ट्राची सीमा ओलांडून गुजरातमध्ये आले तरीही त्यांनी महाराष्ट्राशी असलेले नाते कधीच तोडले नाही.  त्यांनी कायम दोन्ही साहित्य-संस्कृतींना एकजूटीने पुढे नेले. महाराजा गायकवाड यांनी कायमच मराठी आणि गुजराती भाषेतील समन्वय जपला, त्यामुळे आजही कित्येक वर्षानंतर ही बडोद्याची खासियत आहे. या संमेलनाचा मान बडोद्याला मिळाला आहे, हा महाराजा गायकवाड यांचा सन्मानच आहे. त्यामुळे या संमेलनातून दोन्ही राज्यांचे नवे अनुबंध निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.
 

पुढचे संमेलन पुस्तकांच्या गावी करा – विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री, महाराष्ट्र

अनेकदा मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस यांच्या मागण्यांविषयी विचारताना आपण गल्लत करतो. हे तिन्ही वेगवेगळे घटक असून त्यांच्या मागण्या वेगवेगळ्या आहेत, त्यांच्या पूर्तीसाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरु आहेत, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. येत्या २७ फेब्रुवारीला असणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनी आपण  दरवर्षी नवनवीन उपक्रम हाती घेतो. यंदा संगणकावर मराठी भाषेविषयीचे प्रकल्प हाती घेणार आहोत. घुमानपासून आपण संमेलनाचे अनुदान संमेलनापूर्वी देण्याला सुरुवात केली. त्याचप्रमाणे, यंदाही प्रलंबित मागण्यांचा विचार करुन त्या पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहोत. बडोद्यानंतरचे पुढचे संमेलन पुस्तकांच्या गावी भिलारमध्ये आय़ोजित कऱण्यात यावे, अशी इच्छा आहे. या संमेलनाची संपूर्ण जबाबदारी शासन घेईल, आणि संमेलनाचे अनुदानही निश्चितच वाढविण्यात येईल असे तावडे यांनी केले.

 
दुपारी ४ ची वेळ...आग ओकणारा सूर्य...कडक उन्हामुळे अंगाची होणारी लाहीलाही, असा 'ताप' साहित्यप्रेमींनी संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी अनुभवला. उन्हापासून बचाव होण्यासाठी वर्तमानपत्र, ओढणी, स्कार्फ, रुमाल असे साहित्य उपस्थितांच्या डोक्यावर विराजमान झाले होते. कार्यक्रमाला तबबल दीड तास उशीर झाल्याने नाराजीही व्यक्त केली जात होती.
 
सयाजीराव गायकवाड यांच्या  भाषणाची ध्वनीफीत
१९०९ साली बडोदे येथे साहित्य संमेलन पार पडले होते. यावेळी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी केलेल्या भाषणाची ध्वनिफित यावेळी ऐकवण्यात आली. 'भाषेच्या उन्नतीच्या दृष्टीने संमेलन समारंभ वरचेवर झाले पाहिजेत. भाषेद्वारे देशाची उन्नती साधता येऊ शकते. भाषेत कालानुरूप बदल झाले तरी चालतील, पण, विविध माध्यमातून भाषा सार्थ, समर्थ झाली पाहिजे. देशी भाषेच्या शिक्षणाचा उपक्रम सुरू करून, नीती आणि धर्माचे विचार प्रस्तुत केले पाहिजेत. असे करताना संस्कृतला मात्र कमीपणा येता कामा नये. निरनिराळ्या भाषेतील सुंदर विचार भाषेतून सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजेत. तिच्या सहायाने सर्व राष्ट्राचा उत्कर्ष होऊ शकेल. याकामी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे', अशा स्वरूपाचे विचार दूरदृष्टीने सयाजीराव महाराजानी भाषणातून मांडले होते, याची झलक ध्वनीफीतीतून पहायला मिळाली.
 
संमेलन उदघाटन प्रसंगी १५० पृष्ठाच्या 'सेतू' या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्टे करण्यात आले. समरणिकेमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचे कला, संस्कृतीतील योगदान, शहराचा विकास अधोरेखित करणारे लेख, अनुवाद:एक कला, कवितेचे भवितव्य अशा विविध मराठी आणि गुजराती लेखांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी देशमुख यांच्या चार पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.
 
देवेंद्र फडणवीस भाषणासाठी उभे राहताच, बेळगाव, संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या. त्याचवेळी महानुभव पंथाच्या वतीने मराठी विद्यापिठाची मागणी करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. तुमच्या अभिव्यक्तीची नोंद घेत असून, दोन्ही मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल, असे त्यांनी अनुमोदन दिले.

Web Title: Inauguration of the 91st Marathi Sahitya Sammelan in Baroda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.