श्रवणबेळगोळ येथे बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवात सुवर्णरथाचे लोकार्पण, उद्या पहिला अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:45 AM2018-02-16T11:45:24+5:302018-02-16T12:06:16+5:30
कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून भगवान बाहुबली यांच्या मूर्तीवर पहिला मस्तकाभिषेक १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी बाहुबली येथे ३० आचार्यांसह ४०० हून अधिक जैन मुनी, माताजींचे आगमन झाले आहे. दरम्यान, या महोत्सवासाठी खास तयार करण्यात आलेल्या सुवर्णरथाचे शुक्रवारी सकाळी ६.३0 वाजता लोकार्पण करण्यात आले.
भरत शास्त्री
श्रवणबेळगोळ (कर्नाटक ) : कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून भगवान बाहुबली यांच्या मूर्तीवर पहिला मस्तकाभिषेक १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी बाहुबली येथे ३० आचार्यांसह ४०० हून अधिक जैन मुनी, माताजींचे आगमन झाले आहे. दरम्यान, या महोत्सवासाठी खास तयार करण्यात आलेल्या सुवर्णरथाचे शुक्रवारी सकाळी ६.३0 वाजता लोकार्पण करण्यात आले.
सुवर्णरथ लोकार्पण समारंभात श्रवणबेळगोळ मठाचे प्रमुख कर्मयोगी स्वस्तिश्री जगद््गुरू चारूकीर्ती भट्टारक महास्वामी आणि पूज्य १0८ आचार्य पुष्पदंत महाराज यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी करुन या सुवर्णरथामध्ये भगवान बाहुबली आणि चोविस तीर्थंकर मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी सांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील जैन श्रावक-श्राविका अभिषेकासाठी उपस्थित आहेत.
यावेळी चेन्नई येथील नातीदेवी ठोलिया, कमलकुमार जैन, निशी जैन, शुभी अभिषेक जैन, नुपूर करण जैन, मेघना नितिन जैन, शोभदेवी जैन, प्रदीप ठोलिया या कुटूंबियांकडून हा सुवर्णरथ प्रदान करण्यात आला.
यावेळी भट्टारक महास्वामी म्हणाले, शेकडो वर्षांच्या या परंपरेतील आजचा दिवस हा सुवणक्षण आहे. या श्रीक्षेत्राला हा सुवर्णरथ ठोलिया कुटूंबियांकडून प्राप्त झाला आहे. महाबली (तामिळनाडू) येथील रवींद्रन हे या रथाचे शिल्पकार आहेत. यावेळी स्वस्तिश्री जगद््गुरू चारूकीर्ती भट्टारक महास्वामी यांनी सुवर्णदाते नातीदेवी ठोलिया यांना श्रविकारत्न आणि शिल्पकार रवींद्रन यांना स्थपितरत्न या उपाधीने विभूषित केले.
दरम्यान, या सुवर्णरथाच्या लोकापर्णानंतर भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. मस्तकाभिषेक महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव तथा सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील, आचार्य वर्धमानसागर महाराज, स्वस्तिश्री जगद््गुरू चारूकीर्ती भट्टारक महास्वामी उपस्थित होते.
या महोत्सवाच्या निमित्ताने ७ फेब्रुवारीपासून भगवान आदिनाथ मंदिराच्या पंचकल्याण महोत्सवाने सोहळ्याला सुरुवात झाली होती.
या सोहळ्यासाठी ३० आचार्यांसोबत ४०० हून अधिक पिंच्छिधारी मुनी व त्यागीगण श्रवणबेळगोळ येथे सहभागी झाले आहेत.
श्रवणबेळगोळ येथे आचार्य वर्धमानसागर महाराज, चंद्रप्रभूसागर, पंचकल्याणसागर, देवनंदी महाराज, पद्मनंदी महाराज व त्यांचे २० त्यागी, विशुद्धसागर महाराज व त्यांच्यासमवेत ३५ त्यागी, पुष्पदंत सागर महाराज यांच्यासमवेत १ त्यागी, याशिवाय जिनसेन महाराज, सच्छिदानंद महाराज, वासूपुज्य देवसेन महाराज, अमितसागर महाराज, आदर्शसागर महाराज, प्रसन्नश्रुषीजी महाराज, मुनीश्री चिन्मयसागर (जंगलवाले बाबा), गणिनी आर्यिका जिनमती माताजी, क्षमाश्री माताजी, विभाश्री माताजी येथे उपस्थित आहे.