एमएमआरडीएच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन
By admin | Published: January 24, 2016 12:45 AM2016-01-24T00:45:33+5:302016-01-24T00:45:33+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. ही इमारत मेट्रोच्या
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. ही इमारत मेट्रोच्या २ आणि ७ चे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वापरण्यात येणार आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलातील जुन्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या या ९ मजली इमारतीमध्ये अद्ययावत प्रेक्षागृह, दोन सभागृह, दोन तळ घरे, दोन सर्विस फ्लोअर्स आणि सार्वजनिक घोषणा प्रणालीचा समावेश आहे. या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘प्राधिकरणाची नवीन इमारत दिमाखदार असून, केवळ मुंबईतच नव्हे, तर एमएमआरडीए प्रदेशात अद्ययावत पायाभूत सुविधा उभारणाऱ्या संस्थेला साजेशी ही इमारत आहे. प्राधिकरणातर्फे राबविल्या जाणाऱ्या अनेक प्रकल्पांमध्ये जागतिक दर्जाच्या कंपन्यांची नजर असते. अशा प्रथितयश सरकारी यंत्रणेचे कार्यालय आणि इमारत अशीच सुरेख आणि प्रशस्त असायला हवी, असे त्यांनी नमूद केले. दहिसर ते डी.एन.नगर मेट्रो-२ मार्ग आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ हे प्रकल्प प्राधिकरणाने हाती घेतले आहेत. या प्रकल्पासाठी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ही जागा त्यांच्यासाठी उपयोगी पडेल, असे प्राधिकरणाचे आयुक्त यू.पी.एस.मदान म्हणाले.
‘आयकॉनिक’चे काम
९७ महिन्यांनंतर पूर्ण
बीकेसी येथील एमएमआरडीएच्या ‘आयकॉनिक’ इमारत उभारण्यासाठी १०६ कोटींचा खर्च झाला आहे. ९७ महिन्यांनंतर इमारतीचे काम पूर्ण झाले असून, यासाठी अतिरिक्त १९ कोटी खर्च झाला आहे. या इमारतीचे काम ३१-१२-२0१२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु काम वेळेत पूर्ण न झाल्याने कामासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.