‘समृद्धी’चे उद्या उघडणार द्वार; नरेंद्र मोदींच्या हस्ते महामार्गाचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 08:47 AM2022-12-10T08:47:46+5:302022-12-10T08:48:06+5:30
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रो टप्पा दोन आणि नाग नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले
मुंबई : महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० कमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरूनही प्रवास करणार आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थित होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात विविध कार्यक्रम होणार आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रो टप्पा दोन आणि नाग नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. वर्षा निवासस्थानी झालेल्या आढावा बैठकीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधानांचे रविवारी नागपूर विमानतळावर आगमन होणार असून त्यांच्या हस्ते खापरी मेट्रो स्टेशन, नागपूर फेज १ चे उद्घाटन, वंदे मातरम ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणे, झीरो माईल्स ते वायफळ टोलनाका असा प्रवास, वायफळ टोल नाका येथे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, त्यानंतर पंतप्रधानांची सभा होईल.
राज्याच्या समृध्दीची भाग्यरेषा;मुख्यमंत्री
समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरेल. सर्वांगीण विकासात हा महामार्ग गेमचेंजर ठरेल. विदर्भ, मराठवाड्यात औद्योगिक क्रांती करणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
फडणवीसांनी घेतला आढावा
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त सुरू असलेल्या तयारीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी सुरक्षाव्यवस्थेपासून विविध प्रशासकीय तयारीबाबत अधिकाऱ्यांकडून जाणून घेतले.