समृद्धी महामार्गाचे 23 जानेवारीला लोकार्पण; बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचा मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 08:30 AM2022-01-05T08:30:57+5:302022-01-05T08:31:20+5:30
समृद्धी महामार्गाची मूळ संकल्पना केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची असून, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ७ सप्टेंबर २०१६ रोजी या महामार्गाची अधिसूचना निघाली होती.
विजय सरवदे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नागपूर-मुंबई मार्गे औरंगाबाद हा समृद्धी महामार्ग २३ जानेवारी रोजी, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीपर्यंत वाहतुकीसाठी हा महामार्ग सुरू होईल.
काँक्रीटच्या या मार्गाचे औरंगाबाद जिल्ह्यातील ११२ किलोमीटर लांबीच्या काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. हर्सूलच्या पूर्वेस पोखरी शिवारात या रस्त्यावरील बोगद्याचेही काम पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात चार इंटरचेंजेसची कामे पूर्ण झाली आहेत. सावंगी येथील इंटरचेंजच्या ठिकाणी अंडरपासचे (औरंगाबाद-सिल्लोड मार्ग) कामही सुरू आहे. सध्या पांढरे पट्टे मारणे, चिन्हांचे फलक, टोल प्लाझाच्या ठिकाणी इन्फॉर्मेशन सिस्टम, संरक्षक भिंती, पुलांची रंगरंगोटी ही कामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीपर्यंत ५२० किलोमीटरपैकी ४८० किलोमीटर लांबीचा मार्ग तयार आहे. वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांतील काही ठिकाणी पूल व उरलेल्या ४० किलोमीटरचे काम सुरू आहे. तिथे वाहनांना वळण दिले जाईल.
वेगमर्यादा १२० किमी
या महामार्गावर कमाल १५० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहन चालविता येईल; परंतु सध्या शासकीय नियमानुसार १२० कि.मी. प्रतितास वेगमर्यादा राहील, असे ‘एमएसआरडीसी’च्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
nसमृद्धी महामार्गाची मूळ संकल्पना केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची असून, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ७ सप्टेंबर २०१६ रोजी या महामार्गाची अधिसूचना निघाली होती.
nहा महामार्ग भारतातील पहिला शीघ्र संचार ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग.
nनागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या दहा जिल्ह्यांतून महामार्ग जातो.