केंद्र सरकार देणार तृणधान्याला प्रोत्साहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 08:25 PM2018-09-26T20:25:19+5:302018-09-26T20:36:08+5:30
अन्नधान्याचे उत्पादन आणि व्यापार वाढावा यासाठी २०१८-१९ हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे.
पुणे : केंद्र सरकारने ज्वारी, बाजरी, रागी आणि इतर तृणधान्य पिकांना पौष्टीक अन्नधान्य (न्यूट्री सिरीयल) म्हणून घोषित केले आहे. या अन्नधान्याचे उत्पादन आणि व्यापार वाढावा यासाठी २०१८-१९ हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. येत्या २८ सप्टेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमातून या अभियानाची सुरुवात होत आहे.
गणेश खिंड रस्त्यावरील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ को आॅपरेटीव्ह मॅनेजमेंट (वॅमनिकॉम) या संस्थेत हा कार्यक्रम होणार आहे. केंद्र सरकारचा कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि महाराष्ट्राच्या कृषि विभागाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे.
केंद्र सरकारने १३ एप्रिल २०१८ला ज्वारी, बाजरी, रागी आणि इतर तृणधान्य पिकांचे उत्पादन, वापर आणि व्यापार वाढावा यासाठी त्यांना पौष्टिक अन्नधान्य (न्यूट्री-सिरीयल) म्हणून घोषित केले आहे. तृणधान्य पिके घेणारी आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडु, तेलंगना, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल ही राज्ये देखील यात सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात न्यूट्री-सिरीअल पिकांची विविधता, लागवड, उत्पादन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन या विषयावरील संकल्पना मांडण्यात येतील. तसेच त्यावरील प्रदर्शनही आयोजित केले जात आहे. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, कृषी उत्पादक कंपन्या, कृषि विद्यापीठे, संशोधन व विकास संस्था यासारखे विविध भागधारकही यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे सार्वजनिक खाजगी भागीदारीस प्रोत्साहन दिले जाईल.
............