महाराष्ट्रात हे चाललंय काय?; चार दिवसात जळीतकांडाच्या तीन घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 11:36 AM2020-02-05T11:36:11+5:302020-02-05T11:42:11+5:30
चोवीस वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवून दिल्याची संतापजनक घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशा दोन घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.
मुंबई : प्राध्यापिकेला पेटविल्याच्या हिंगणघाट येथील घटनेने समाजमन सुन्न असताना तशाच आणखी दोन घटना समोर आल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात अंधारी येथे एकाने घरात घुसून महिलेला पेटवून दिले, तर बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने २६ वर्षीय महिलेच्या अंगावर आरोपीने ज्लवनशील द्रव्य ओतल्याची घटना मुंबईजवळील काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
चोवीस वर्षीय प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवून दिल्याची संतापजनक घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशा दोन घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. रविवारी रात्री अंधारी येथे महिला घरी एकटी असताना संतोष मोहिते नावाचा व्यक्ती घरात शिरला. महिलेने त्याला बाहेर काढण्याचा प्रयल केला असता संतोष याने तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. त्यानंतर आरोपीने दरवाजाची कडी लावून पोबारा केला.
महिलेने आरडाओरड केल्याने घराशेजारी राहणारी तिची मुलगी व जावई यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तिला त्वरित सिल्लोड रुग्णालयात दाखल केले. नंतर औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात नेले. ही महिला ९५ टक्के जळाली असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत. मंगळवारी पोलिसांनी जबाब नोंदविल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
तर बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार देणाऱ्या महिलेवर आरोपीने ज्लवनशील द्रव्य ओतल्याची घटना काश्मीर येथे शुक्रवारी घडली. पोलिसांनी आरोपीला अहमदाबाद येथून अटक केली. आरोपीने तिला रस्त्यात अडवून बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास धमकावले. तिने नकार दिल्याने आरोपीने तिच्या अंगावर ज्वालाग्रही द्रव्याने भरलेली बाटली फोडली. त्यात ती पीडिता गंभीर जखमी झाली. भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे.