मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी महिलेला दिले अगरबत्तीचे चटके
By admin | Published: September 29, 2016 01:20 AM2016-09-29T01:20:43+5:302016-09-29T01:20:43+5:30
अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार; महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केले.
सचिन राऊत
अकोला, दि. २८- मानसिक आरोग्य बिघडलेल्या महिलेची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या नातेवाईकांनी भोंदू बाबाकडून उपचार करून घेतले. यामध्ये सदर महिलेच्या शरीरावर चक्क अगरबत्तीचे चटके दिल्याचा अघोरी प्रकार उघड झाला आहे. या महिलेवर शहरातील एक मानसोपचार तज्ज्ञ उपचार करीत असून, सध्या तिची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे.
जिल्हय़ातील एका गावातील विवाहित महिलेची मानसिक स्थिती ठीक नव्हती. तिला पुर्ववत बरे करण्यासाठी गावातीलच काही अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या लोकांनी तिला भोंदू बाबाकडे नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सदर महिलेला भोंदू बाबाला दाखविले असता, भोंदू बाबाने तिचा आजार दूर करण्यासाठी या महिलेला अगरबत्तीचे चटके दिल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला. संपूर्ण शरीरावर चटके दिल्यानंतरही महिलेची प्रकृती ठीक न झाल्याने तिला शहरातील मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी आणण्यात आले. मानसोपचार तज्ज्ञांनी या महिलेवर उपचार केल्यानंतर त्या महिलेची प्रकृती आता ठीक असल्याची माहिती आहे. आजच्या युगात वैद्यकीय क्षेत्रातही अनेक नवनवीन शोध लावण्यात येत आहेत. प्रत्येक आजारावर विविध लस उपलब्ध करून आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी जगातील प्रत्येक देशात स्पर्धा सुरू आहे. यामध्ये भारतही कुठे कमी नाही; मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आजही अनेक ठिकाणी अंधश्रद्धेचे अघोरी प्रकार सुरूच असल्याचे वास्तव या घटनेने समोर आले आहे. त्यामुळे अशा भोंदू बाबांचे चेहरेही पोलिसांनी उघड करण्याची गरज निर्माण झाली आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग असतानाही अंधश्रद्धेवर विश्वास असणार्या एकाने सदर महिलेला अगरबत्तीचे चटके दिले; मात्र त्यानंतरही महिलेची मानसिक स्थिती ठीक झाली नाही. तिच्यावर उपचार केल्यानंतर आता महिला ठीक आहे.अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन हे अघोरी प्रकार बंद करण्यासाठी प्रत्येकाने जागृत होण्याची गरज आहे.
- डॉ. दीपक केळकर ,
मानसोपचार तज्ज्ञ, अकोला.