राज्यात दररोज तीन ठिकाणी पोलिसांना मारहाणीच्या घटना; आतापर्यंत ८१२ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 04:32 AM2020-05-18T04:32:11+5:302020-05-18T04:32:40+5:30
कोविडच्या प्रतिबंधासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर पोलीसही अहोरात्र झटत आहेत. विनाकारण भटकणाºया नागरिकांना रोखणे आणि गरजूना मदत करण्याची भूमिका बजावित आहेत.
मुंबई : राज्यात लॉकडाउन सुरू झाल्यापासून बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिसांशी मारहाण करणे, त्यांना हुज्जत घालण्याच्या घटना वाढत राहिल्या आहेत. रोज सरासरी दोन ते तीन गुन्हे दाखल होत असून या हल्यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत ८१२ जणांना अटक करण्यात आली आहे. तर काहीजण फरारी आहेत.
कोविडच्या प्रतिबंधासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर पोलीसही अहोरात्र झटत आहेत. विनाकारण भटकणाºया नागरिकांना रोखणे आणि गरजूना मदत करण्याची भूमिका बजावित आहेत. मात्र काही समाजकटंक व माथेफिरू नागरिक जमावबंदीचा आदेश डावलून नियमांचे राजरोसपणे उल्लंघन करीत आहेत. पोलीस त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्याशी हुज्जत घालणे, नाकाबंदीत अंगावर गाडी घालणे, मारहाण करण्याचे प्रकार करीत आहेत. २२ मार्चपासून १६ मे पर्यत राज्यात अशा तब्बल २३६ घटना घडल्या आहेत, म्हणजेच रोज सरासरी दोन ते तीन प्रकार घडत आहेत. त्यांच्यावर शासकीय कर्तव्यात अडथळा आणणे आणि सरकारी कर्मचाºयाला मारहाण केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ८१२ जणांना अटक केली आहे. तर काही हल्लेखोर फरारी आहेत. त्याचा शोध सुरु आहे. तर लॉकडाउनच्या काळात सर्व नियमांचे पालन करून कोरोनाशी मुकाबला करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे .
या काळात अवैध वाहतूक करणाºया १३०५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ५८,५६८ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. राज्यात एकूण ३८८४ रिलिफ कॅम्प आहेत. तर जवळपास ३,७१,३१० लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोविड संदर्भात एक लाख ९ हजार गुन्हे
लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यभरात आतापर्यंत कोविड संदर्भातील एक लाख ९ हजार ३९४ गुन्हे दाखल झाले आहेत. जमावबंदी आदेश मोडणे, अवैध वाहतूक आणि पोलिसांना मारहाणप्रकरणी हे गुन्हे असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी २०,६२६ व्यक्तींना अटक केली आहे. तर चार कोटी ३६ लाख ७४ हजार ८९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या काळात पोलीस नियंत्रण कक्षात तब्बल ९३ हजार फोन आले. तर अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ३,६८,९७१ पास देण्यात आलेले आहेत.