राज्यातील २ कोटी महिलांचा बचत गटांमध्ये समावेश करा; एकनाथ शिंदेंचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 11:46 AM2023-10-17T11:46:59+5:302023-10-17T11:50:02+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविण्यास मान्यता दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविण्यास मान्यता दिली आहे, या कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार करण्यात आला असून या कार्यक्रमातील समाविष्ट कामे, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
‘नमो ११ कलमी’ कार्यक्रमाच्या नमो महिला सशक्तीकरण अभियानातून ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या राज्यातील ६० लाख महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या असून ही संख्या २ कोटी करण्यासाठी ग्रामविकास, महिला व बालविकास विभागाने प्रयत्न करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या. राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा लवकरच शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘नमो कामगार कल्याण’ अभियानातून ७३ हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. नमो शेततळी अभियानातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचा प्रयत्न असून त्यासाठी ७३०० शेततळ्यांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन दिला जाईल, राज्यातील ७३ गावे आत्मनिर्भर गावे विकसित करण्यात येणार असून गरीब आणि मागासवर्गीय वस्त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विशेष अभियान राबविण्यात येत येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यात ७३ ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी करण्यात येणार असून आदिवासी विकास विभागाच्या ७३ शाळा स्मार्ट करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात ७३ ठिकाणी दिव्यांगांसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करण्यात येणार असून यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याच्या सूचना देऊन यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, तालुक्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ७३ गावांमध्ये मुलांसाठी क्रीडा मैदाने विकसित करण्याची कार्यवाही सुरु करा या सूचना देतानाच नमो शहर सौंदर्यीकरण अभियानातून राज्यातील २५ महानगरपालिका आणि ४८ नगरपालिकांमध्ये सौंदर्यीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच ७३ मंदिरांच्या विकासासाठी तांत्रिक मान्यतेची कार्यवाही गतीने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
प्रधानमंत्री @narendramodi यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून या उपक्रमाच्या नियोजनाचा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आढावा घेतला. या कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार करण्यात आला असून या… pic.twitter.com/lzXRAkR6Yv
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 16, 2023