मूळ तक्रारदार खडसेंचाही प्रतिवादींमध्ये समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 05:50 AM2018-06-24T05:50:05+5:302018-06-24T05:50:22+5:30
यावल पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीचा प्रथम माहिती अहवाल (एफआआर) रद्द करण्याची विनंती करणाऱ्या सामाजिक
औरंगाबाद : यावल पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीचा प्रथम माहिती अहवाल (एफआआर) रद्द करण्याची विनंती करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या याचिकेत मूळ तक्रारदार तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचाही प्रतिवादींमध्ये समावेश करण्याचे निर्देश न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठाने शुक्रवारी दिले.
इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश देत खंडपीठाने याचिकेची पुढील सुनावणी ५ जुलै रोजी ठेवली आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांचे जनसंपर्क अधिकारी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात आपण एकनाथ खडसे यांच्याकडे पैसे ठेवायचे आणि त्यांना ट्रॅपमध्ये अडकवायचे अशी आॅफर अंजली दमानिया यांनी आपल्याला दिली होती, असा दावा केला होता. या मुलाखतीआधारे एकनाथ खडसे यांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले होते. काहीही घडलेलेच नाही, त्यामुळे एफआयआर रद्द करावा, अशी विनंती तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक सुनावणीवेळी करण्यात आली. या प्रकरणात राज्य शासन आणि मुक्ताईनगर पोलीस यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. दमानिया यांच्यातर्फे अॅड. सतेज जाधव, खडसे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ विनायक दीक्षित काम पाहत आहेत.