विमानतळाच्या नावात ‘महाराज’ या उपाधीचा समावेश करा
By admin | Published: February 20, 2016 03:18 AM2016-02-20T03:18:21+5:302016-02-20T03:18:21+5:30
छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नावात शिवरायांच्या ‘महाराज’ या उपाधीचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती वसंत डावखरे यांनी शुक्रवारी केली.
मुंबई : छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नावात शिवरायांच्या ‘महाराज’ या उपाधीचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती वसंत डावखरे यांनी शुक्रवारी केली.
शिवजयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या आॅल इंडिया एव्हिएशन एम्प्लॉईज असोशिएशन आणि राष्ट्रीय कर्मचारी संघटनेच्यावतीने विमानतळावर शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते विमानतळासमोरील शिवरायांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी आ. हनुमंत डोळस, आ. निरंजन डावखरे, आ. नरेंद्र पाटील, आ. राहुल नार्वेकर, चित्रा वाघ आणि सिद्धी विनायक मंदीर न्यासचे अध्यक्ष नरेंद्र राणे व्यासपीठावर होते. यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष आमदार किरण पावसकर यांनी विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केला. विमानतळाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्यात यावे, यासाठी गेली अनेक वर्षे आपण पाठपुरावा करत आहोत. जीव्हीके विमानतळ प्रशासनाने जनतेच्या भावना लक्षात घेत विमानतळाच्या नावात ‘महाराज’ या उपाधीचा समावेश करावा, अशी मागणी पावसकर यांनी केली.
यानंतर सभापती निंबाळकर आणि उपसभापती डावखरे यांनी छत्रपती शिवाजी आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नावात महाराज या उपाधीचा समावेश व्हावा या पावसकर यांच्या मागणीला मान्यता दिली. याविषयी जीव्हीके कंपनीला विमानतळाच्या नावात बदल करण्याचे सूचित केले व शासकीय स्तरावर असा बदल करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन आपल्या भाषणातून केले.
या कार्यक्रमास मुंबई युवक अध्यक्ष मनोज व्यवहारे, मुंबई सरचिटणीस सलिम माफखान, वेंकटेश मानव, जावेद देऊळकर, सरचिटणीस गणेश शेट्टी, चैतन्य माईनकर, धीरज सावंत, नितीन कासारे आणि युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.