आयकर सहआयुक्तास लाच घेताना अटक
By admin | Published: December 12, 2015 02:31 AM2015-12-12T02:31:37+5:302015-12-12T02:31:37+5:30
एका बिल्डरकडून पाच लाखांची लाच स्वीकारताना आयकर विभागाचे सहआयुक्त संतोष जांगरे यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या लाचलुचपत विरोधी विभागाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली
मुंबई : एका बिल्डरकडून पाच लाखांची लाच स्वीकारताना आयकर विभागाचे सहआयुक्त संतोष जांगरे यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या लाचलुचपत विरोधी विभागाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली असून, जांगरेच्या पवईतील तीन बंगल्यांवर धाड टाकून सीबीआयने दीड किलो सोने आणि मालमत्तेशी संबंधित दस्तावेज जप्त केले. किडनीचा आजार आणि मधुमेह असल्याचे कोर्टाला सांगितल्याने त्याची रवानगी कोठडीत होण्याऐवजी त्यास जे. जे. इस्पितळात दाखल करण्यात आले.
मागच्या वर्षी दाखल करण्यात आलेले कर निर्धारण (असेसमेन्ट) फेरतपासणीस घेणाऱ्या जांगरेने ३० लाख रुपये दिले नाहीत, तर १.२० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची धमकी सांताक्रूझ येथील एका बिल्डरला दिली होती. पिरामल चेम्बर्समधील आयकर विभागाच्या कार्यालयात सहआयुक्त असलेल्या जांगरेविरुद्ध ९ डिसेंबर रोजी तक्रार करण्यात आली होती. तक्रारदाराच्या चार्टर्ड अकाउंटंटला जांगरे अशी धमकी दिली की, कर निर्धारण फाइल पुन्हा उघडली असून, प्रकरण मिटविण्यासाठी तक्रारदाराने तातडीने भेट घ्यावी. सुरुवातीला जांगरेने बिल्डरकडे ३० लाख रुपये मागितले. नंतर २५ लाखांवर सौदा केला. त्यापैकी पहिल्या हप्त्यापोटी ५ लाख रुपये देण्याचे ठरले. बाकी रक्कम १० ते १५ दिवसांत देण्यास सांगितले, असे सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले. बिल्डरच्या तक्रारीनंतर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून बिल्डरला पाच लाख रुपयांसह जांगरेला भेटण्यास पाठविले. जांगरेने फोन करून बिल्डरला आयकर कार्यालयानजीकच्या हनुमान मंदिराजवळ बोलावले. बिल्डर त्या ठिकाणी आल्यानंतर जांगरेने त्याला स्वत:च्या कारमध्ये बसण्यास सांगितले. कार काही अंतर पुढे नेत बिल्डरकडून पैसे घेतले. त्यानंतर कार थांबवून बिल्डरला कारमधून उतरण्यास सांगितले. तोच आम्ही त्याची कार अडवून त्याला लाच घेतांना रंगेहाथ अटक केली, असे सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले.
जांगरेची रवानगी पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत करायची की नाही, याचा निर्णय जांगरेचा वैद्यकीय अहवाल पाहिल्यानंतर घेतला जाईल, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. देशपांडे यांनी शुक्रवारी सायंकाळी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)