जैन उद्योग समुहाच्या तीन कंपन्यांसह देशभरातील आस्थापनांची प्राप्तीकर विभागाकडून तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 02:42 AM2020-02-28T02:42:04+5:302020-02-28T02:43:36+5:30
डॉक्टर, सीए, लेखापालकडे तपासणी
जळगाव : जैन उद्योग समुहाच्या जळगाव येथील तीनही कंपन्यांसह देशभरातील आस्थापनांची प्राप्तीकर विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एकाच वेळी तपासणी सुरु केली. या पथकात १०० ते १५० जणांचा समावेश आहे. पथकाने समुहाशी संबंधित असलेले सीए, अकाउंटंट, डॉक्टर, सहकारी बँक, व्यावसायिक अशा २६ ठिकाणी एकाचवेळी तपासणी सुरू केली. रात्रीपर्यंत ही तपासणी सुरूच होती.
जैन समुहाच्या दालनांसह निवासस्थानीदेखील पथकाने तपासणी केली. या खेरीज एका सुवर्ण पेढीचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळाली. जैन उद्योग समुहाने जळगावात सुरुवात करून देश-विदेशात आपला विस्तार केला. कंपनीतील तपासणीबाबत नेमके कारण समजले नसले तरी गेल्या वर्षापासून कंपनी नुकसान सहन करीत असल्याचे कारण दाखवित नुकत्याच समाप्त झालेल्या तिमाही अहवालातही तोटा झाल्याचे कंपनीने नमूद केले. त्यात कराविषयीदेखील संशय आल्याने प्राप्तीकर विभागाने कंपनीसह त्यांच्याशी संबंधित आस्थापना, सीए, अकाउंटंट, डॉक्टर, बँक, ट्रॅक्टर दालन यांच्यावर लक्ष केंद्रीत केले. त्यानंतर गुरुवार, २७ रोजी थेट प्राप्तीकर विभागाचे पथक जळगावात दाखल झाले.
एकाच वेळी छापा
गुरुवारी दुपारी जैन उद्योग समुहाच्या जळगावातील बांभोरी येथील जैन पाईप, शिरसोली रस्त्यावरील जैन हिल्स, फूड पार्क यासह
देशभरातील समुहाच्या सर्वच कार्यालयांची तपासणी सुरु करण्यात आली. दुपारी कंपनीत पथक पोहचल्यानंतर त्या ठिकाणी विविध खाते, संगणक, वेगवेगळे रेकॉर्ड, होणारा पुरवठा याची तपासणी झाली. या पथकात नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अकोला येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
समुहाशी संबंधित आस्थापना, व्यक्तींकडेही तपासणी
जैन उद्योग समुहाशी संबंधित असलेले तीन ते चार सीए, अकाउंटंट यांच्याकडेही पथकाने तपासणी केली. याशिवाय शिवाजीनगरातील एका ट्रॅक्टर दालनामध्येही चार ते पाच जणांचे पथक पोहचले होते. तेथेदेखील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीबाबत दुपारी सर्वत्र चर्चा सुरू झाली. मात्र प्रत्यक्ष अधिकारी, कंपनीसह तपासणी झालेल्या सर्वच ठिकाणी कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती. या तपासणीबाबत जैन उद्योग समुहाशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही.