औरंगाबादेत आयकर विभागाचे छापे

By admin | Published: March 18, 2015 01:39 AM2015-03-18T01:39:32+5:302015-03-18T01:39:32+5:30

शहरातील १२ ज्वेलर्स व १० बिल्डर्सच्या कार्यालयांवर मंगळवारी आयकर विभागाने छापे टाकले़ दुपारी सुरू झालेली तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.

Income Tax department raids in Aurangabad | औरंगाबादेत आयकर विभागाचे छापे

औरंगाबादेत आयकर विभागाचे छापे

Next

औरंगाबाद : शहरातील १२ ज्वेलर्स व १० बिल्डर्सच्या कार्यालयांवर मंगळवारी आयकर विभागाने छापे टाकले़ दुपारी सुरू झालेली तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. यामुळे शहरात पुन्हा एकदा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
आयकर विभागाच्या विविध पथकांनी मंगळवारी दुपारी एकाच वेळी शहरात बिल्डरांची कार्यालये व ज्वेलर्सच्या शोरूममध्ये तपासणी सुरूकेली. कासारी बाजार, सराफा बाजार, जवाहर कॉलनी येथील १२ ज्वेलर्स शोरूमचे शटर दुपारपासून अर्धवट बंद करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी आयकर विभागाचे चार अधिकारी स्टॉक, कागदपत्रांची तपासणी करीत होते. त्याचवेळी काही बिल्डर्सच्या कार्यालयातही आयकर अधिकारी तपासणी करीत होते. सुमारे १३० ते १५० अधिकारी तपासणीच्या कामात गुंतले होते. या तपासणीची माहिती सायंकाळपर्यंत शहरातील व्यावसायिकांमध्ये पसरली. व्हॉटस् अ‍ॅपवर ही माहिती पाठविली जात होती. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरू होती. यासंदर्भात काही ज्वेलर्सनी सांगितले की, आमच्या शोरूममध्ये दुपारी अचानक आयकर विभागाचे अधिकारी आले. त्यांनी आपली ओळख दाखवून सर्वप्रथम शोरूमचे शटर अर्धवट खाली करण्यास सांगितले. यानंतर शोरूममधील सोने- चांदी दागिन्यांच्या नोंदी व खरेदी बिले याची तपासणी सुरू केली. यानंतर बिले, मालाची आवक-जावक रजिस्टर, विक्री रजिस्टर, आयकरशी संबंधित कागदपत्रे तपासली जात होती. सदर प्रतिनिधीने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण संवाद होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)

कारवाईचा इशारा
आयकर विभागाने २४ फेब्रुवारी रोजी शहरातील ८ प्रतिष्ठानांच्या कागदपत्रांची तपासणी केली होती. यात इलेक्ट्रॉनिक्स, सॉ मिल, हार्डवेअर, आॅप्टिकल्स, खाजगी क्लासेस यांची एकाचवेळी तपासणी केली होती. त्यावेळी अतिरिक्त आयकर आयुक्त बी.पी.सिंग यांनी इशारा दिला होता की, ज्यांनी आयकर विवरण दाखल केले नाही, अशांची यादी तयार करून आम्ही त्यांच्यावर कारवाई करीत आहोत. तसेच तपासणीमध्ये आयकर बुडवल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते. विभागाने २१ दिवसांनंतर मंगळवारी पुन्हा नवीन २२ ठिकाणी कारवाई केली.

 

Web Title: Income Tax department raids in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.