फेसबुकवरील फॉरेन ट्रीपच्या फोटोंवर इन्कम टॅक्सचे लक्ष ?
By Admin | Published: May 22, 2016 09:33 AM2016-05-22T09:33:31+5:302016-05-22T09:36:12+5:30
सध्या सोशल मिडीयाचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे. अनेकजण पर्यटन स्थळी किंवा पिकनिकला गेल्यानंतर तिथले फोटो फेसबुकवर पोस्ट करतात.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - सध्या सोशल मिडीयाचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे. अनेकजण पर्यटन स्थळी किंवा पिकनिकला गेल्यानंतर तिथले फोटो फेसबुकवर पोस्ट करतात. आपल्या आयुष्यातील आनंदी क्षण इतरांशी शेअर करणे हा त्यामागे हेतू असतो. पण असे फोटो पोस्ट करताना आता काळजी घेण्याची गरज आहे. कारण तुमच्या फेसबुक अकाऊंटवर इन्कम टॅक्स अधिका-यांची नजर असू शकते.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अनेक करदाते कर भरताना आपले उत्पन्न कमी दाखवतात. त्यासाठी व्यवसायातील मंदी किंवा अन्य कारणे दिली जातात. पण त्याचवेळी करदाते सहकुटुंब परदेशी सहलीला जातात आणि तिथले फोटो फेसबुकवर मित्रपरिवार आणि आप्तजनांन बरोबर शेअर करतात. याच परदेशी सहलींच्या फोटोंचा करसंदर्भात चौकशीमध्ये इन्कम टॅक्सकडून वापर होत आहे.
मुंबई, दिल्ली, चेन्नईमधल्या करदात्यांना असा अनुभव आलेले नाही. पण निमशहरी, ग्रामीण भागातील करदात्यांच्या फेसबुक पोस्टवर लक्ष ठेवले जात आहे. पश्चिम बंगाल असनोलमध्ये एक चार्टर्ड अकाऊंटटला त्याच्या फॅरेन ट्रीपच्या फोटोवरुन हा अनुभव आला. करदात्याच्या फेसबुक पोस्टवर फोटो दिसले म्हणून त्यावरुन थेट कुठलाही निष्कर्ष काढला जात नाही किंवा त्रास देण्यासाठी त्याचा वापर होत नाही. मात्र या फेसबुक पोस्टवरुन करदात्याची जीवनशैली आणि खरे उत्पन्न जाणून घेणे हे दोन हेतू आहेत.