प्राप्तिकर अधिका-याला सीबीआयकडून अटक
By admin | Published: December 30, 2016 07:49 PM2016-12-30T19:49:38+5:302016-12-30T19:49:38+5:30
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - प्राप्तिकर विभागाच्या एका निरीक्षकाला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. सारसबागेजवळील विश्व हॉटेलजवळ गुरुवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या घरझडतीमध्ये तब्बल 4 लाख 46 हजारांच्या नवीन नोटा आढळून आल्या आहेत. यासोबतच सोन्याची बिस्किटेही आढळून आल्याची माहिती अधीक्षक एम. आर. कडोळे यांनी दिली. राजेंद्र बी. दोंड असे अटक केलेल्या निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश ढमाले यांनी सीबीआयकडे तक्रार दिली होती. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, दोंड हा प्राप्तिकर विभागामध्ये अधिकारी आहे. प्राप्तिकर विभागाच्या असेसमेंट विभागामध्ये त्याची नेमणूक वॉर्ड क्रमांक 2 (2) चा प्रभार त्याच्याकडे आहे. ढमाले यांनी 2013 मध्ये सदनिका व एक दुकान खरेदी केले होते. या दुकानाचा रेडी रेकनरचा दर आणि खरेदी किमती यामध्ये 35 लाखांची तफावत येत होती. दोंड याने याच कारणावरुन त्यांची अडवणूक करीत प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. यामधून सुटका हवी असल्यास 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
ढमाले यांनी सीबीआयच्या एसीबीकडे याबाबत तक्रार दाखल केली. अधिका-यांनी गुरुवारी संध्याकाळी सारसबागेजवळील विश्व हॉटेलजवळ सापळा लावला. लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्वीकारताना दोंड याला रंगेहात पकडण्यात आले. त्याला अटक करण्यात आली आहे.
सीबीआयच्या एका पथकाने दोंड याच्या घरावर छापा टाकला. त्याच्या घराची कसून झडती घेण्यात आली आहे. त्याच्या घरामध्ये दोन हजार रुपयांच्या तब्बल 223 नोटा आढळून आल्या आहेत. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. यासोबतच 350 ग्रॅम सोन्याची बिस्कीटे, पुण्यात दोन फ्लॅट आणि सोलापूर येथील जमिनीची कागदपत्रे मिळून आली आहेत. दोंड याची विविध बँकांमध्ये बारा खाती असून एका बँकेत लॉकर आहे. या लॉकरची तपासणी सुरु असल्याचे अधीक्षक एम. आर. कडोळे यांनी सांगितले.