मोठी बातमी! उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाचे छापे; तब्बल 240 कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 10:30 AM2021-12-27T10:30:09+5:302021-12-27T10:30:26+5:30
आयकर विभागाने नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. जमीन खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत.
नाशिक: काही दिवसांपासून देशात विविध ठिकाणी आयटी (Income Tax Department) आणि ईडी (Enforcement Directorate)चे धाडसत्र सुरू आहे. या धाडीदरम्यान मोठे मासे गळाला लागले आहेत. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी छापे सुरू आहेत. आयकर विभागाने नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले असून, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसात आयकर विभागाने तब्बल 31 ठिकाणी छापेमारी केली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 240 कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. यात 6 कोटींची रोकड, 5 कोटींचे दागिन्यांचाही समावेश आहे. इतकी अफाट संपत्ती जमवली कशी आणि आतापर्यंत याकडे कुणाचेही लक्ष कसे गेले नाही? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.
175 अधिकाऱ्यांची एकाचवेळी धाड
जमीन खरेदी विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाने छापेमारीत जप्त केलेलं कोट्यवधींचं घबाड मोजण्यासाठी तब्बल 12 तास लागले आहेत. छाप्यात सोन्याचे बिस्किट्स, मौल्यवान हिरे सापडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. ही कारवाई करण्यासाठी 22 गाड्यांमधून 175 अधिकारी एकाचवेळी वेगवेगळ्या मार्गाने संबंधित ठिकाणांवर पोहचले होते. त्यांच्यासोबत तगडा पोलीस बंदोबस्तही होता.